तामसी योगमाया मोहिनी । तत्काळ मोहिला तो प्राद्युम्नि ।
मुकुलितमुद्रा पडिली नयनीं । निवांत शयनीं पहुडला।
लेप्यलेखें विगतचेष्टा । तैसी निश्चळ लागली का÷ा ।
नमूनि पार्वतीनीलकंठां । मग मंचक मुकुटीं वाहियला।
अनिरुद्धेसी मंचक शिरिं । घेऊनि निघाली खेचरी ।
सवेग नेऊनि शोणतपुरिं । उषामंदिरिं उतरिला ।
प्राणसखये उषेकारणें । म्हणे स्वकान्त ओळखी नयनें ।
येरी आनंदभरित मनें । सस्मितवदनें उठिली ।
मुखावरील काढूनि पदर । सादर पाहे नरसुन्दर ।
नवयौवन ठाणठकार । केला निर्धार रमणाचा ।
चित्रलेखेतें म्हणे साजणी । तूं निजांची मायबहिणी ।
प्रत्यक्ष तव रूपें भवानी । मज निर्वाणीं पावली ।
तुझिया उपकारा उत्तीर्ण । व्हावया पदार्थ न दिसे आन ।
तनुमनप्राणें होऊनि शरण । धरिले चरण सद्भावें ।
येरी उचलोनि दोहीं करिं । आलिङ्गिली बाणकुमरी ।
म्हणे जैसी शंकरगौरी । तेंवि शेजारिं वर भोगीं ।
आतां होईल या जागर । साधीं परिचर्या सादर ।
सलज्ज होऊनि न राहें दूर । होईं तत्पर सेवेसी ।
प्रमदाशरीर प्रमादकर । मदिरेहूनि मादक फार ।
मदिरा मोही अष्ट प्रहर । शत संवत्सर प्रमदा पैं ।
मादकपणाची हेचि गरिमा । विनयभावें धरिजे प्रेमा ।
रंगता परिचर्येच्या कामा । कान्त संगमा अभिलाषी ।
सस्मित सलज्ज मितभाषण । व्यंकटकटाक्षनिरीक्षण।
सस्नग्धि करितां शुश्रूषण । पुरुष द्रवोन वश होय ।
सहसा न कीजे उतावळी । असंलग्न रहावें जवळी ।
सकाम पुरुष प्रेमें कवळी । अल्प करतळीं वारिजे त्या ।
निकरें न झाडावा कर । हास्यें वाढविजे आदर ।
तेणें पुरुष स्मरातुर । होय तत्पर क्रीडेसी ।
नवसंगमीं तनुइंगितें । सलज्ज संकोच अवयवांतें ।
करितां पुरुष आसक्तचित्तें । होय वनितेतें वशवर्ती ।
ऍड. देवदत्त परुळेकर








