प्रतिनिधी / खेड
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मूळगाव असलेल्या मुंबके येथील ६ वडिलोपार्जित मालमत्तांच्या लिलावानंतर दुमजली बंगल्याच्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभारण्याचा मानस बंगला खरेदी करणाऱ्या अॅड. अजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाऊदच्या झालेल्या मालमत्ता लिलावादरम्यान दिल्ली येथील अॅड. अजय श्रीवास्तव यांनी दुमजली बंगला ११ लाख ३० हजार रूपयांची बोली लावत विकत घेतला आहे. हा बंगला विकत घेण्यापूर्वी अॅड. श्रीवास्तव यांनी २ नोव्हेंबर रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत मालमत्तेची पाहणी केली होती. त्यानंतरच मालमत्ता लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवत बंगला खरेदीसाठी ११ लाख ३० हजार रूपयांची बोली लावली होती.
लिलावादरम्यान दाऊदचा दुमजली बंगला अॅड . श्रीवास्तव यांनी खरेदी केला आहे. हा बंगला पाडून त्याठिकाणी सरकारच्या परवानगीने नवी इमारत उभारून त्याठिकाणी स्वयंसेवी संस्था उभी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अॅड. श्रीवास्तव यांनी यापूर्वी २००१ मध्ये मुंबई – ताडदेव येथील ३०० चौरस फुटाचा कमर्शियल गाळा २ लाख ५० हजार रूपयांमध्ये विकत घेतला होता. मात्र, या लिलावाला दाऊदची बहिण हसिना परकार यांनी न्यायालयात आव्हान दिल्याने हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.
Previous Articleसातारा : कराडात भूमापक अधीक्षकांसह सहाय्यक लाच घेताना जाळ्यात
Next Article बेळगाव जिह्यात बुधवारी 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद









