भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले नगर परिषदेने खेळाडूंसाठी दिवाळी भेट म्हणून नेमबाजीसाठी शूटिंग रेंजची सुविधा कॅम्प येथील व्यायाम शाळेच्या वरच्या भागात उपलब्ध केली आहे. ही सुविधा दिवाळीत खुली करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हय़ात सर्वात मोठी शूटिंग रेंज असलेल्या या हॉलमध्ये भविष्यात ओपन साईड व पिप साईड गटाच्या शालेय स्पर्धा भरविणे शक्य होणार आहे.
सावंतवाडी येथील कांचन उपरकर हे त्यांच्या एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्रामार्फत खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. न. प.ने कॅम्प भागात असलेल्या व्यायाम शाळेत सुमारे चार लाख रुपये खर्चून कॅरम व टेबल टेनिसबरोबरच शूटिंग रेंजसाठी मोठा हॉल बनविला आहे. भाडेतत्वावर हा हॉल उपरकर यांच्या प्रशिक्षण केंद्रास देण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
वेंगुर्ले शहरात सर्व खेळांची व्याप्ती वाढवून सशक्त पिढी निमार्ण करणाचा मानस असून त्यादृष्टीने सर्व नगरसेवक व प्रशासन यांना विश्वासात घेऊन आपण या शहरात सर्व खेळांसाठी मैदाने सुरू करणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.









