वार्ताहर/ साखर कोंबे
राजापूर तालुक्यातील जानशी पठार येथे बिबटय़ाने गोठय़ातील वासरावर हल्ला करून ओढत जंगलात नेत असताना गावातील काही तरूणांनी धाडस दाखवत बिबटय़ाचा पाठलाग करून वासराला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवून आणले. रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
जानशी पठार येथील राजन कुवेस्कर यांच्या यांच्या घरालगत असलेल्या गोठय़ामध्ये मध्यरात्री 1 च्या सुमारास बिबटय़ा शिरला. तब्बल 35 किलोच्या वासरावर त्याने हल्ला चहवला, त्याचे मजबूत दावे त्याने तोडले. त्याचवेळी त्याने गाईवरही पंजा मारला. गोठय़ात सुरू असलेली ही झटापट ऐकून राजन कुवेसकर यांचे पुतणे निखिल यांना जाग आली. त्यांनी खिड़की उघडून पाहिले असता बिबटय़ा वासराला तोंडात धरून जात होता. त्यानंतर निखिलने जोरजोरात ओरडायला सुरूवात केली. त्याची ओरड ऐकून चुलते सुधीर आणि राजन कुवेसकर यांच्यासहित आजूबाजूची तरुण मंडळी गोठय़ाकडे धावतच निघाली आणि मग सुरू बिबटय़ाचा थरारक पाठलाग सुरू झाला. मध्यरात्र असूनही हातात दांडे घेऊन तरूणांनी बिबटय़ाचा पाठलाग केला. बिबटय़ाने जवळपास 1 किलोमीटर लांब जंगलात गेल्यावर एका घळीत गेल्यावर वासराला सोडले. बंडय़ा कुवेस्कर यांनी रांगत जाऊन त्या घळीतून वासराला बाहेर काढले.
मध्यरात्री वासराला अणसुरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी यशवंते यांच्याकडे नेऊन टाके घालण्यात आले. औषधोपचार केल्यावर आता वासराच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. राजन कुवेस्कर, सुधीर कुवेसकर, निखिल कुवेस्कर, प्रभाकर कुवेस्कर, आबा कुवेस्कर, बंडय़ा कुवेसकर आदींनी धाडसाने वासराला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवत जीवदान दिले.









