मुस्लिमांमधील मतविभागणी रालोआच्या पथ्यावर
बिहारच्या मुस्लीमबहुल सीमांचलमध्ये हैदराबादचे खासदार तसेच ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. एआयएमआयएमने बिहारच्या 20 जागांवर स्वतःचे मतदारसंघ उभे केले होते, ज्यातील 14 उमेदवार सीमांचल भागातील मतदारसंघातील हेते. बिहार निवडणुकीच्या निकालानुसार ओवैसी यांचा पक्ष 3 जागांवर आघाडीवर तर दोन मतदारसंघांमध्ये दुसऱया स्थानावर राहिला आहे. अशाप्रकारे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टरमुळे महाआघाडीचा खेळ बिघडल्याचे मानले जात आहे. तर एआयएमआयएमच्या वाढत्या प्रभावाचा थेट लाभ रालोआला मिळाला आहे.
सीमांचलाच्या 24 विधानसभा मतदारसंघांपैकी रालोआला 11 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाआघाडी केवळ 5 जागांवर आघाडीवर आहे. याचबरोबर इतरांना 8 जागा मिळविता आल्या आहेत. यातील ओवैसी यांचा पक्ष 3 जागांवरा आघाडीवर आहे. ओवैसी यांच्या पक्षाने अमौर तसेच कोचाधामन मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. परंतु अनेक मतदारसंघांमध्ये ओवैसी यांचा पक्ष विजयी झाला नसला तरीही त्यांच्या कामगिरीमुळे महाआघाडीच्या हातातून राज्याची सत्ता निसटली आहे.
सीमांचल भागातील 24 मतदारसंघांमध्ये महाआघाडीच्या वतीने राजद 11, काँग्रेस 11, भाकप-माले 1 आणि माकपने 1 जागेवर निवडणूक लढविली आहे. तर रालोआकडून भाजप 12 आणि संजद 11 आणि हमने एका जागेवर उमेदवार उभा केला होता. सीमांचल भागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसने तेथील 9 जागांवर यश मिळविले होते. तर संजदला 6 आणि राजदला 3 जागा जिंकता आल्या होत्या.
तर भाजपला 6 आणि एका ठिकाणी भाकप मालेला यश मिळाले होते. 2015 च्या निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाने सीमांचलमधील 6 मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले होते. ज्यातील कोचाधामन मतदारसंघात एमआयएमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान दुसऱया स्थानी पोहोचले होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत किशनगंज मतदारसंघात एआयएमएमआयने विजय मिळविला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत तेथे भाजपने यश मिळविले असून काँग्रेस पक्ष दुसऱया स्थानावर राहिला आहे. तर ओवैसी यांच्या पक्षाचा उमेदवार तिसऱया स्थानावर गेला आहे.
सीमांचलमधील जागा सीमांचलमध्ये किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहार हे जिल्हे येतात. या भागात एकूण 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. नरपतगंज, रानीगंज, फारबिसगंज, अररिया, सिकटी, जोकीहाट, कटिहार, कदवा, बलरामपूर, प्राणपूर, मनिहारी, बरारी, कोढा, हादुरगंज, ठाकुरगंज, किशनंगज, कोचाधामन, कस्बा, बनमनखी, रुपौली, धमदाहा, पूर्णिया, अमौर तसेच बैसी हे मतदारसंघ आहेत. या 4 जिल्हय़ांमधील मुस्लीम मतदारांचे प्रमाण किशनगंजमध्ये सुमारे 70 टक्के, अररियामध्ये 42 टक्के, कटिहारमध्ये 43 टक्के आणि पूर्णियामध्ये 38 टक्के इतके आहे.









