प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे म्हणत मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येत असते. दिवाळी म्हटली की फराळ, नवीन कपडे, नवीन साहित्य, वाहने यांची खरेदी जोरात असते. बेळगावच्या बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. यामुळे बऱयाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर असा उत्साह बाजारात पाहायला मिळत आहे.
नोकरदारांचा पगार व बोनस झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून खरेदीची धूम सुरू आहे. मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, काकतीवेस, शहापूर या भागात खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच अशा प्रकारचा खरेदीचा उत्साह बाजारात दिसत आहे. केवळ कपडे व किराणाच नाही तर ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, शोभिवंत वस्तू, तयार फराळ, चंदन, सुगंधी उटणे, साबण, आकाश कंदिल यांची विक्री होत आहे.
गर्दीचा उत्साह पाहता मंगळवारीदेखील दुकाने सुरू ठेवतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या सोबतच नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नसल्याने नागरिकांनी याचाही विचार करणे गरजेचे आहे.









