एकसंबा येथील जोतिबा मंदिरातील घटना : तिघे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
वार्ताहर/ एकसंबा
जोल्ले शिक्षण संस्थेच्या नणदी कॅम्पस येथील जोतिबा मंदिरात 15 लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. यामध्ये सोने व चांदीचे दागिने तिघा चोरटय़ांनी लांबविल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. याप्रकरणी ठसे तज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक असलेल्या ठिकाणी अशी धडसी चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक माहिती अशी, रविवारी रात्री 11.47 च्या सुमारास तिघा चोरटय़ांनी संरक्षक भिंतीवरून उडी मारून जोल्ले शिक्षण संस्थेच्या आवारात असलेल्या जोतिबा मंदिरात प्रवेश केला. तिघांपैकी एकाने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून गर्भगृहात प्रवेश केला. यावेळी तेथे असलेले दागिने सदर चोरटय़ाने बाहेर उभे राहिलेल्या साथीदारांना दिले. यामध्ये त्याने दोनदा गर्भगृहात जाऊन दागिने लांबविल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते आहे. अवघ्या 15 मिनिटात चोरांनी हा डाव साधला आहे. 12.05 मिनिटांनी चोरटय़ांनी आलेल्या मार्गावरूनच पलायन केल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सोमवारी पहाटे सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर तेथील कर्मचाऱयांनी सदर प्रकार संस्थेच्या वरि÷ांना कळविला. तसेच सदलगा पोलिसांनादेखील याबाबतची माहिती देण्यात आली. सकाळी सदलगा पोलीस ठाण्याचे फौजदार आर. वाय. बिळगी घटनास्थळी दाखल झाले. चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नायक, निरीक्षक आर. आर. पाटील यांनीही सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. 11 च्या सुमारास ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. सुमारे तासभर श्वान मंदिर परिसरासह शेजारून जाणाऱया शेतीच्या रस्त्यावरून जात धागेदोरे शोधत होते. मात्र सध्या तरी पुरावे सापडले नसल्याचे समजते.
राहिली केवळ मूर्तीच
चोरटय़ांनी मंदिरातील देवाचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत. देवाच्या हातातील तलवारही चोरटय़ांनी चोरली आहे. सर्व अलंकार घेऊन चोरटे पसार झाले. केवळ देवाची मूर्तीच शिल्लक राहिली आहे. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक व सीसीटीव्हीच्या नजरेतूनही चोरटय़ांनी डाव साधल्याने सामान्य नागरिकांतून मात्र भितीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सकाळपासूनच गावात चोरी प्रकरणी तर्कवितर्कांना उधाण आले होते. मंदिरात चोरी झाल्याचे समजताच मंत्री शशिकला जोल्ले यांनीही सकाळी पाहणी करून घटनेची माहिती घेतली.
शुक्रवारीही झाली चोरी
एकसंबा येथील शिवयोगी मठासमोर असलेल्या गंगा इरिगेशन दुकानात शुक्रवारी रात्री 10.54 च्या सुमारास चोरटय़ाने पाठीमागील पत्रा काढून दुकानात प्रवेश करीत दुकानातील लॅपटॉप व 60 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. सीसीटीव्हीमध्ये सदर घटनादेखील कैद झाली आहे. याही प्रकरणाची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
जोतिबा मंदिर असो वा मठाजवळील दुकानात झालेल्या धाडसी चोरीमुळे पोलिसांसमोर चोरटय़ांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकसंबा परिसरात या अगोदरदेखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरीच्या प्रकरणात वाढच होत असल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.









