वार्ताहर/ रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील रामनगरपासून अनमोड घाट-गोवा हद्दीपर्यंतचा रस्ता अर्धवट असल्याने सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे.
बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूरपासून गोवा हद्दीपर्यंतचा रस्ता म्हणजे वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी बनली असून गेल्या दोन वर्षांपासून सदर रस्त्याचे काम बंद असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर पावसाळ्यात चिखलामुळे रहदारीसाठी रस्ता बंदच होता. आता धुळीचा सामना करत बरीच वाहने सावकाश या मार्गावरून ये-जा करत होती. परंतु नुकताच दि. 7 नोव्हेंबर रोजी कारवार जिल्हाधिकाऱयांनी हा रस्ता अर्धवड स्थितीत असून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व वाहनांसाठी मार्ग बंद असल्याचे नोटिसीद्वारे कळविले आहे. याबाबत रामनगर पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांना विचारले असता जिल्हाधिकाऱयांच्या आदेशामुळे मंगळवार दि. 10 पासून रामनगर व कर्नाटक हद्दीजवळ बॅरिकेट्स घालून वाहनांना दुसऱया बाजूने परतविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महामार्ग बंद आदेश मागे घेण्यासाठी प्रवासी-व्यावसायिकांचे प्रयत्न
सध्या या मार्गावरून बरीच लहान-मोठी वाहने ये-जा करत असल्याने या मार्गावर अवलंबून असलेले व्यावसायिक आनंदी होते. पण या निर्णयामुळे त्यांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले आहे. तर गोवा-बेळगाव तसेच गोवा सीमेलगत असणाऱया अनेक गावातील नागरिकांचे गोव्याशी जवळचे संबंध असून मोठय़ा प्रमाणात व्यवसायासाठी व नोकरी संबंधी नागरिक ये-जा करतात. त्यांचीही गैरसोय होणार आहे. या महामार्गाच्या कामाबद्दल न्यायालयात तारखांवर तारखा पडत असल्याने हे काम लवकर होण्याची संभावना नाही. त्यामुळे सध्या महामार्ग बंद करण्याचा आदेश मागे घेण्यासाठी सर्व प्रवासीवर्ग व्यावसायिक प्रयत्न करीत आहेत.