प्रतिनिधी / सातारा
31 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक करणारा भामटा वाई तालुक्यातील चांदवडी गावात आल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली होती. भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार भुईंज पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचे नाव राज शहा उर्फ गणेश विठोबा शिंदे( रा.चांदवडी, ता. वाई ) असे आहे.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कामोठे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे भा.द.वि.स.420,34 या गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी गणेश शिंदे हा चांदवडी येथे आल्याची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांना खास खबऱ्याकडून मिळाली. गणेश याने तब्बल 31 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक करून तो फेब्रुवारी 2020 पासून फरार होता.
त्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी एक पथक नेमले. पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोलीस शिपाई वर्णेकर, महिला पोलीस साळुंखे असे त्या पथकात होते. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून गणेश शिंदे याच्या मुसक्या आवळून कामोठे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.