धगधगत्या भारत-चीन सीमेवरील ‘चिशुल’ या अंतिम गावातील लढवय्या ग्रामस्थांशी थेट संवाद
थेट भारत-चीन सीमेवरून / शेखर सामंत, सिंधुदुर्ग
‘आम्ही या देशाचे सुपुत्र आहोत. हा देश, ही भूमी म्हणजे आमची माता आहे. या मातेच्या रक्षणासाठी वाट्टेल ते बलिदान देण्यास आम्ही तयार आहोत. केवळ आम्ही हे सांगत नाही, तर वारंवार हे आम्ही सिद्धही करून दाखवलंय. ‘दिल दिया है.. जां भी देंगे.. ए वतन तेरे लिए..’
देश प्रेमाने भारलेले वरील बोल आहेत सामाजिकदृष्टय़ा अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या भारत-चीन सीमेवरील ‘चिशुल’ या गावातील ‘सेवाँग’ हय़ा युवकाचे. धगधगत्या भारत-चीन सीमेवरील समुद्र सपाटीपासून 14 हजार 600 फूट उंचीवर असलेल्या सीमेवरील या अंतिम गावात थंडीचा पारा उणे 23 डिग्रीच्याही खाली उतरला असताना आणि वातावरणात ऑक्सिजनची मात्रा अतिशय कमी असल्याने श्वास घेणेही मुष्कील होत असताना ‘तरुण भारत’च्या टीमने थेट या गावात वास्तव्य करून ग्रामस्थांशी संवाद साधला. याच दरम्यान पहाटेच्या वेळी गावच्या सीमेवरील उंच पहाडांवर शत्रूला रोखून धरलेल्या भारतीय जवानांना तेल, पाणी व खाद्यपदार्थ घेऊन निघालेल्या गावातील आबालवृद्धांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.
‘चिशुल’ सीमेवरही चिनी सैनिकांना रोखण्यात भारतीय सैनिकांना यश
‘अरेला कारे’ असे उत्तर देत जाबाँज भारतीय सैनिकांनी गलवान घाटीत चिनी सैनिकांना माती खाण्यास भाग पाडल्यानंतर चिनी सामर्थ्याचा फुगा फुटला व या देशाची जगभर नाचक्की झाली. भारताकडून असा ठोसा बसेल, अशी अपेक्षा नसलेला चीन त्यामुळे बिथरला आणि त्याने गलवान येथून काहीशी माघार घेत थेट लेहपासून 200 किमी अंतरावर असलेल्या सीमेवरील चिशुल या गावाच्या बाजूने घुसखोरी करण्यास सुरुवात केली. 29 ऑक्टोबरला या गावातील काही मेंढपाळ शेळय़ा व याक घेऊन गावाच्या सीमेवरील उंच पहाडावर गेले होते. त्यावेळी त्यांना काही चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. हे शत्रू सैनिक याच गावाभोवतीच्या उंच-उंच पहाडावर चौक्या आणि बंकर उभारतानाही आढळून आले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच हे सर्व मेंढपाळ लगबगीने माघारी परतले आणि गावात येऊन त्यांनी प्रमुख नागरिकांपर्यंत ही खबर पोहोचवली. त्यानंतर ही माहिती तात्काळ भारतीय आर्मीला कळविण्यात आली. भारतीय आर्मीच्या ‘स्पेशल प्रंटियर फोर्स’ च्या तुकडय़ा ‘चिशुल’ गावात पोहोचल्या. तोपर्यंत चिनी सैनिकांनी गावापासून नऊ ते दहा किमी अंतरावर असलेल्या उंच उंच मोक्याच्या पहाडावर बंकर व चौक्या उभारण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे सामाजिकदृष्टय़ा अत्यंत मोक्याची असलेली ही ठिकाणे हातची जातील म्हणून जादा मदतीच्या कुमकीची वाट न पाहता त्या पहाडांवर धाव घेत मोक्याच्या जागा सैनिकांनी अडवण्यास सुरुवात केली आणि त्यात यशही मिळविले.
शत्रूच्या नाकासमोर उभारल्या चौक्या
खरं तर पुरेशी साधनसामुग्री सोबत नसताना शत्रूला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेण्याचे धाडस जगातील कुठल्याही सेनेने दाखविले नसते. पण भारतीय जवानांनी ते दाखवले. त्या मागचे प्रमुख कारण होते ते चिशुल गावातील ग्रामस्थांवरचा विश्वास. भारतीय सेनेकडून रसद पुरवठा होईल, पण चिशुल ग्रामस्थही आम्हाला निश्चितपणे मदत करतील, हा विश्वास भारतीय जवानांना होता. या विश्वासाच्या जोरावर या जाँबाज भारतीय जवानांनी चिनी सैनिकांसमोर येऊन चौक्या ठोकल्या. अवघ्या चारशे ते पाचशे मिटर अंतरावर या चौक्या उभारण्यात आल्या.
भारतीय जवानांच्या मदतीला चिशुलवासीय गेले धाऊन
उणे 30 ते 35 डिग्री तापमानात, भारतीय जवानांनी चीन सैनिकांच्या नजरेला नजर भिडवत चौक्या ठोकल्या खऱया, परंतु या जवानांना तब्बल दोन दिवस उपाशीपोटी शत्रूच्या समोर उभं ठाकावं लागलं. पोटात अन्नाचा कणही नसताना आणि अती उंचावर श्वास घेणेही मुष्कील असताना हे जवान शत्रूला एक इंचही पुढे येऊ देत नव्हते. आपले जवान उपाशीपोटी लढताहेत, हे लक्षात येताच चिशुल ग्रामस्थांनी धाडसी निर्णय घेतला आणि तात्काळ गावातील घराघरात चुली पटल्या. भाकऱया, जेवण, दूध, पाणी आणि थंडीपासून बचाव करणारे साहित्य सोबत घेऊन गावातील छोटी मुले, युवक, युवती, महिला आणि बुजुर्ग पहाटेच्या अंधाराचा फायदा उठवत शत्रूला पूर्ण अंधारात ठेवून उंच पहाडांवर भारतीय जवानांच्या दिशेने रवाना झाले. दहा वर्षांच्या मुलांपासून 70 वर्षांपर्यंतच्या वृद्धांचाही यात समावेश होता. अंग गोठविणारी थंडी आणि वातावरणात पुरेसा ऑक्सीजन नसताना हे चिशुलवासी वेगवेगळय़ा पहाडांवरच्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचले. त्यांनी आपल्या जवानांना जेवू-खाऊ घातले. सोबत आणलेली ब्लँकेट्स दिली. त्याचबरोबर आणखी खाद्यपदार्थ सोबत दिले. त्यांची तहान भागवली. चिशुलवासीयांच्या या प्रेमाने आघाडीवरच्या जवानांच्या डोळय़ात अश्रू आले नसते, तर नवलच.
तब्बल दहा दिवस भारतीय जवानांना पुरविले घराघरातून जेवण
भारतीय आर्मीचा पुरेसा रसद पुरवठा येईपर्यंत तब्बल दहा दिवस या चिशुल ग्रामस्थांनी एक रुपयाही न घेता शत्रूच्या नाकासमोर आपल्या भारतीय जवानांच्या खाण्यापिण्याची, अगदी स्वत:चा जीव पणाला लावत काळजी घेतली. आता भारतीय आर्मीची सर्व सामुग्री पहाडावर पोहोचली असून भारतीय सैनिकांची स्थिती खूपच मजबूत झाली आहे. मात्र अशाही परिस्थितीत अजूनही चिशुल ग्रामस्थ भारतीय चौक्यांवरील जवानांना पाणी, तेल व अन्य सामुग्री पुरवताना या जवानांच्या खांद्याला खांदा लावून सीमेचे रक्षण करताना दिसत आहेत. देशप्रेमाने भारावलेल्या ग्रामस्थांना सॅल्यूट ठोकत ‘तरुण भारत’ टिम एक दिवसाच्या मुक्कामानंतर पुढील दौऱयासाठी मार्गस्थ झाली.
देशासाठी वाट्टेल ते बलिदान – चिशुल सरपंच
चिशुल गावातील या मुक्कामादरम्यान या गावच्या महिला सरपंच चिंग डोलकस्ट ‘तरुण भारत’ टीमशी बोलताना म्हणाल्या, शत्रू अगदी नजीक आला आहे, हे खरं आहे. पण आम्ही त्याला सीमेच्या आत घुसू देणार नाही. भारतीय जवानांना वाट्टेल ती मदत करायला तयार आहोत. देशासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. शासनाने किमान जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा या गावाला पुरवाव्यात. आम्हाल फक्त दिवसातील सहा तास वीज उपलब्ध करून दिली जाते. या गावात मोबाईल रेंज मिळत नाही. अति थंडीच्या दिवसात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो. अशावेळी किमान जगण्यासाठी तरी शासनाने आम्हाला सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या गावच्या देशाप्रती दिलेल्या योगदानाचे वृत्तांकन करण्यासाठी शेकडो किलोमिटरचा प्रवास करून ‘तरुण भारत’ची टीम ग्राऊंड झीरोवर म्हणजे थेट सीमेवर पोहोचल्याबद्दल त्यांनी टीमचे मनापासून आभारही मानले.