प्रतिनिधी / बेळगाव
वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे रविवारी 50 व 100 कि.मा.r सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 50 कि.मी. सायकलिंगमध्ये 95 तर 100 कि.मी. सायकलिंगमध्ये 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यामध्ये 25 महिलांनी सहभाग घेतला होता. संतोष शानभाग व अजित शेरीगार यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
फिट इंडिया या मोहिमेंतर्गत वेणुग्रामने या रॅलीचे आयोजन केले होते. मागील 4 वर्षांपासून वेणुग्राम सायकलिंग क्लब विविध उपक्रम राबवित आहे. प्रत्येक महिन्याला एकदा मोठय़ा राईडचे आयोजन करण्यात येते. रविवारी आरपीडी चौक ते वंटमुरी घाट व तेथून पुन्हा आरपीडी चौक असा 50 कि.मी. रॅलीचा प्रवास होता. तर 100 कि.मी. रॅली आरपीडी ते संकेश्वर व पुन्हा आरपीडी असा मार्ग ठेवण्यात आला होता.
मार्ग पूर्ण केलेल्या स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी लोकमान्य सोसायटीची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली होती. वाटेत कोणत्याही सायकलपटूला त्रास झाल्यास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.









