वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आय लीगचा 14 वा मोसम जानेवारी 9 पासून कोलकाता येथे सुरू होणार असल्याचे अ.भा. फुटबॉल फेडरेशनने शनिवारी जाहीर केले.
या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून त्यात सहभागी होणाऱया 11 संघांना त्यांच्या पहिल्या सामन्याच्या 14 दिवस आधी जैवसुरक्षित बबलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण वन स्पोर्ट्सवरून केले जाणार आहे. या लीगची आधीची आवृत्ती कोरोना महामारीमुळे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली होती. महामारीचा बहर थोडाफार ओसरल्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये आय लीग पात्रता स्पर्धा घेण्यात आली होती. पश्चिम बंगाल सरकार व भारतीय फुटबॉल संघटना (आयएफए) यांच्या साथीने एआयएफएफने ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी प.बंगाल सरकार आणि आयएफएने बिनशर्त सहकार्य केल्याबद्दल लीगचे सीईओ सुनंदो धर यांनी आभार मानले आहेत. आय लीग पात्रता स्पर्धा म्हणजे हिरो आय लीग स्पर्धेची रंगीत तालीमच होती. ही स्पर्धा दीर्घ लांबीची आणि प्रत्येक संघासाठी आव्हानात्मक असते. या स्पर्धेचे आयोजनही यशस्वीरीत्या केले जाईल, असा विश्वास धर यांनी व्यक्त केला.
या लीगच्या पहिल्या टप्प्यात 11 संघ एकमेकांविरुद्ध एकदा लढत देतील. त्यानंतर त्यांचे दोन गट करण्यात येतील. गुणतक्त्यातील पहिले सहा संघ पुन्हा एकदा एकमेकांशी एकेक लढत खेळतील आणि यातून विजयी संघ निश्चित केला जाईल. उरलेल्या पाच संघांत पुन्हा एकदा एकमेकांशी लीग फॉरमॅटप्रमाणे लढत होईल. सर्व 15 सामन्यांत मिळून सर्वाधिक गुण मिळविणारा संघ 2020-21 चा आय लीग विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. कोव्हिड 19 संदर्भात क्रीडा मंत्रालयाने जी मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे, त्यानुसार सामने घेतले जाणार असून सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.









