यमनापूर जवळ गॅसचा टँकर रस्त्याच्या बाजुला गेल्याने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर महामार्गावरील यमनापूर जवळ चालकाला डुलकी आल्याने गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या बाजुला गेला. याला लागूनच इलेक्ट्रीक मोठे पोल होते. सुदैवानेत्याला टँकरची धडक बसली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक जवळपास 2 कि.मी.वरच रोखून धरली.
मुंबईहून कोचीकडे पॉपीलाईन गॅस कंपनीचा टँकर क्रमांक एनएल 01 एई 1109 निघाला होता. यमनापूर जवळ येताच चालकाला डुलकी आली. यामुळे नियंत्रण सुटून टँकर रस्त्याच्या बाजुला गेला. त्याच्या शेजारीच विद्युत खांब होता. टँकर सुदैवानेच कलंडला नाही. अन्यथा मोठा स्फोट झाला असता. या घटनेमुळे बराच गोंधळ उडाला. तातडीने या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली.
अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. गॅस गळती नसल्यामुळे धोका नसल्याचे त्यांना दिसून आले. ही पाहणी करेपर्यंत पोलिसांनी या मुख्य रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजुला अडविली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. नंतर टँकर बाजुला काढण्यात आला. त्याचबरोबर वाहतूकही सुरळीत करण्यात आली. मात्र बराच उशीरा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.









