आतापासूनच नियोजन करण्याची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील जनतेला कोरोना लस देण्याबाबत आतापासूनच तयारी करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना केली आहे. शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेऊन ही सूचना केली. या बैठकीला आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
सध्या जिल्हय़ामध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. ही बाब समाधानकारक आहे. कोरोनाची लस कधी येईल हे सांगता येत नाही. मात्र, लस येताच ती तातडीने देण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी त्याचे नियोजन करण्याच्या तयारीला लागलावे, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले.
शहर व ग्रामीण भागामध्ये एकाचवेळी ही लस द्यायची आहे. सरकारच्या माध्यमातूनच ही लस दिली जाणार आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एक ते दोन टप्प्यात ही लस द्यायची आहे. यावेळी आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ यांनीही इतर अधिकाऱयांना सूचना केल्या.
या बैठकीला महापालिका आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते.









