प्रतिनिधी / चिपळूण
विक्रीच्या उद्देशाने दोन वाहनांतून घेऊन जाणारा 26 लाख रूपये किंमतीचा गुटखा चिपळूण पोलिसांनी शहरातील रंगोबा साबळे परिसरात शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील दोघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे आहेत.
मुश्ताक जिकर कच्छी ( चिपळूण ) अंकुश सुनील केसरकर, संदीप भैरु पाटील ( दोघेही सावंतवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ कांबळे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक कच्छीसह अंकुश केसरकर, संदीप पाटील हे शहरातील रंगोबा साबळे मार्गालगतच्या नजराना अपार्टमेंट परिसरात आयशर टेम्पो व मारुती इको या दोन वाहनांमध्ये विक्रीच्या उद्देशाने गुटखा भरुन ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकली.
यात धाडीत पोलिसांनी 26 लाख 9 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. रात्री उशिरा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली आयशर टेम्पो, मारुती इको ही दोन वाहने जप्त केली. शनिवारीवरील तिघांना न्यायालयात हजर केले. असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समेद बेग, पोलीस कर्मचारी आशिष भालेकर, पंकज पडेलकर, महिला पोलीस आदिती जाधव आदींच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वागणेकर करीत आहेत.









