आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधान मोदींचे विधान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत उत्कृष्ट स्थान आहे. आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करून अनेक नियम सोपे व सुलभ बनविले आहेत परिणामी भारतात आगमन केल्यास गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा पुरेपूर लाभ उठविता येईल, असे आश्वासक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते गुरूवारी जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
भारताने कृषी उत्पन्न व शेतकऱयांची स्थिती सुधारण्यासाठी कृषी सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठय़ा गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातील व्यवसाय आणि व्यापार यांना नवी कौशल्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जागतिक गुंतवणुकीमुळे हे उद्दिष्टय़ गाठणे शक्य होणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
आत्मनिर्भरतेचा मंत्र उपकारक
नुकताच भारताने आत्मनिर्भरतेच्या मार्गावर प्रवास सुरू केला आहे. आमचे आत्मनिर्भरतेचे तत्वज्ञान केवळ एक तत्वज्ञान नसून ते एक सुनियोजित आर्थिक धोरण आहे. या धोरणातून आम्ही भारतातील कल्पकता आणि तंत्रकौशल्य यांची गुणवत्ता जागतिक योग्यतेची करण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याचा आमचा मानस आहे, अशीही भलावण त्यांनी केली.
भारताने जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कोरोना विषाणूला रोखण्याचे कार्य चांगल्याप्रकारे केले. त्यामुळे जिवीत हानी कमी झाली. कोरोना रोखण्याबरोबरच अर्थव्यवस्थाही सुस्थिर करण्याचे आव्हान होते. तेही आम्ही यशस्वी रितीने पेललेले आहे. आता वैश्विक गुंतवणूकदारांनी भारताच्या या अनुकूल वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले.









