शिवसेना मालवण तालुकाप्रमुख यांची माहिती
प्रतिनिधी / मालवण:
मत्स्य पॅकेजमध्ये असलेल्या त्रुटींबाबत मत्स्य व्यवसायमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मत्स्य पेटय़ांऐवजी रोख स्वरुपात अनुदान देण्यात यावे, मच्छीमार कुटुंबातील मासेमारी करणाऱया सर्व सदस्यांना या पॅकेजचा लाभ देण्यात यावा. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यानुसार आवश्यक बदल केले जाणार आहेत. त्यामुळे मच्छीमार, मत्स्यविपेत्या महिलांनी या पॅकेजबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, असे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मत्स्य पॅकेजबाबत मच्छीमारांमध्ये तसेच मत्स्यविपेत्या महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या पॅकेजमधील त्रुटींबाबत आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री, मत्स्य्य आयुक्त यांचे लक्ष वेधत, या त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी केली आहे. यात मच्छीमार कुटुंबातील मासेमारी करणाऱया मच्छीमारांना या पॅकेजचा लाभ देण्यात यावा. मत्स्यपेटय़ांऐवजी रोख स्वरुपात अनुदान द्यावे आदी मागण्या केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक बदल करण्यात येतील, असे संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत अनुदानाचा लाभ निश्चित होत नाही, तोपर्यंत लाभार्थ्यांनी जीएसटी पावती जोडू नये. अनुदानाच्या यादीत नाव आल्यानंतरच जीएसटी पावती लाभार्थ्यांनी जोडावी. या मत्स्य पॅकेजमध्ये जे बदल आवश्यक आहेत, ते न झाल्यास मच्छीमारांची जी भूमिका असेल, त्या सोबत आम्ही राहू, असेही खोबरेकर यांनी स्पष्ट केले.