80 वर्षात प्रथमच संगीत महोत्सव कार्यक्रम खंडित
औंध/ प्रतिनिधी
दरवर्षी अश्विन वद्य पंचमीला मूळपीठगडाच्या पायथ्याशी असलेल्या कलामंदीरात सप्तसुरांची बरसात व्हायची. गेली 80 वर्ष ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे संगीत महोत्सव कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रम रद्द झाल्याने सूराचा बेसूर झाला.
गायनाचार्य पं. गजानन बुवा जोशी अंतुबुवा जोशी यांनी अध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद यांच्या स्मृती प्रित्यर्थ मूळपीठच्या पायथ्याशी असलेल्या दत्त मंदिरात संगीत महोत्सव कार्यक्रम सुरू केला. सुरवातीला छोटेखानी स्वरूपात साजरा होणाऱ्या कार्यक्रमाचे 1981 नंतर स्वरूप बदलले. शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यापक रुपात महोत्सव सुरू झाला. देशातील दिग्गज कलाकरांनी आपली कला याठिकाणी सादर केली. ग्रामीण भागात सुरू असलेला एकमेव शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. शौकिनांना या महोत्सवाची आस लागते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विश्वस्तांनी आँनलाईन महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळी दत्त मंदिरात शिवानंद स्वामी यांच्या समाधीस्थळी विश्वस्त पल्लवी जोशी, सुनील पवार यांनी अभिषेक करून पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर गजानन बुवा जोशी यांच्या शास्त्रीय गायनाची ध्वनीफित लावून शिवानंद स्वामी यांना शब्दसुरांची सुमनांजली वाहण्यात आली. यंदा संगीत महोत्सव झाला नसल्याची रुखरुख औंधकरांच्या मनात राहून गेली.









