पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांचा दावा
प्रतिनिधी / मडगाव
राज्यात कोळसा हा प्रकल्प 1947 पासून सुरु आहे. गोव्यात कोळसा हा भाजप सरकारने आणलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱया सरकारात आम्ही ‘गोवा हा कोळसा हब होऊ देणार नाही’, असे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल म्हणाले.
मडगाव दक्षिण गोवा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस, उल्हास तुयेंकर व तुळशीदास नाईक उपस्थित होते.
गोव्यात कोळसा हब करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. काही नेते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘सागर माला’ प्रकल्प हा केंद्र सरकारचा आहे. या प्रकल्पाची माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे. गोव्याचा सर्वांगीण विकास होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आज राज्यात अनेक प्रकल्प येत आहे. रस्ता रुंदीकरण, क्रिडा क्षेत्रात विकास व आदी प्रकल्पाचे काम आज सरकारने हाती घेतलेले आहे. असे मंत्री काब्राल यांनी यावेळी सांगीतले.
‘अदानी’ एक कोळसा प्रकल्प चालवत आहे. अदानी हा कोळसा स्वताच्या कंपनीसाठी आणत नाही. तर राज्यात असलेल्या कंपनींना पुरविण्यासाठी ते कोळसा आणत आहे. ते एक व्यापारी या नात्याने कोळसा आणतात. बेरोजगारी दूर व्हावी या हेतूने राज्यात प्रकल्प येणे गरजेचे आहे.
कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस म्हणाले की, रेल्वे मार्गच्या दुपदरीकरणाला लोकांचा पूर्वी विरोध नव्हता. पण, जेव्हा पासून रेल्वे दुपदरीकरण हे गोव्यात कोळसा हब सुरु करण्यासाठी होत असल्याचे काही लोकांनी सांगितले, तेव्हापासून लोकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली. पण, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा प्रकल्प कोळसा हब तयार करण्यासाठी नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.









