लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचा विश्वास
वृत्तसंस्था / काठमांडू
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे बुधवारपासून नेपाळच्या तीन दिवसांच्या दौऱयावर दाखल झाले आहेत. या भेटीच्या माध्यमातून भारत-नेपाळ यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा आशावाद नरवणे यांनी व्यक्त केला आहे.
नरवणे यांना नेपाळचे लष्करप्रमुख पूर्णचंद्र थापा यांनी आमंत्रित केले होते. नेपाळशी सीमा विवादानंतर नरवणे यांची ही पहिली भेट आहे. तसेच नरवणे यांना नेपाळी लष्कराचे मानद जनरलपद देण्यात येणार आहे. तसेच त्यांची नेपाळी लष्करप्रमुखांशीही विशेष बैठक होणार असून ते शुक्रवारी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा यांची भेट घेतील.
काठमांडू येथे गुरुवारी होणाऱया कार्यक्रमात लष्करप्रमुख भारताच्या वतीने नेपाळला वैद्यकीय मदत देणार आहेत. यात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे समाविष्ट आहेत. कोरोना साथीच्या काळात भारत सतत शेजारच्या देशांना मदत करत आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळसाठी वैद्यकीय मदत महत्त्वपूर्ण असल्याचे नेपाळमधील भारतातील वरि÷ अधिकाऱयांनी
सांगितले.
नेपाळच्या लष्करी मुख्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात जनरल नरवणे यांना नेपाळ सैन्याच्या मानद जनरलपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. ही 70 वर्षांपासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. 1950 पासून भारत-नेपाळदरम्यान सुरू असलेल्या परंपरेअंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या सैन्यप्रमुखांना मानद पद देतात. नरवणे हे नेपाळच्या लष्करी मुख्यालयातील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन तेथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते शिवपुरी येथील आर्मी कमांड आणि स्टाफ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
वादाची पार्श्वभूमी
2 नोव्हेंबर 2019 रोजी भारताने आपला नवीन नकाशा प्रसिद्ध केला. नेपाळने यावर आक्षेप घेतला होता आणि कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख भाग हा त्यांचा प्रदेश म्हणून संबोधले होते. यावषी 18 मे रोजी नेपाळने या तिन्ही क्षेत्रांचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला. हा नकाशा संसदेच्या दोन्ही सभागृहात गेला. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. मे-जूनमध्ये नेपाळने भारताच्या सीमेवर सैनिक वाढवले. नेपाळच्या सैनिकांनी बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर काही भारतीयांवर गोळीबार केल्यामुळेही द्विपक्षीय तणाव निर्माण झाला होता. यावषी मे महिन्यापासून नेपाळ आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला असताना नरवणे यांनी केलेल्या विधानामुळे नेपाळने नाराजी व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत जनरल नरवणे यांचा नेपाळ दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे.









