वसगडे विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडेबाबांची भाकणूक
संतोष माने / उचगांव
महामारी वर्षाअखेरीस कमी होईल, रोहीणीचा पाऊस मृगाचा पेरा,रोगराई कानानं ऐकाल पण डोळ्याने पाहणार नाही, मिरची भडकेल, पाऊसमान वाढेल कडधान्य महाग होतील, तांबडं रास मध्यम राहील, काळी रास सुकळ जाईल, अतिरेकी संकट येईल, दुधाचे भांडी आणि उसाची कांडी यामुळे राज्यात राजकारणाला कलाटणी मिळेल, जनावरांचे किमती वाढतील, राजकारणात स्त्रिया बाजी मारतील, एंदा पेरणीचा गैरमेळ उडल, आणि माझी जो सेवा करील त्याला कांबळया खाली घेईन अशी भाकणूक आबादेव नामदेव वायकुळे(फरांडेबाबा) यांनी करवीर तालुक्यातील वसगडे येथे श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत पालखी उत्सवासमोर केली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल -बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या अखंड जयघोषात,धनगरी ढोल-कैताळाच्या निनादात,भंडार्याच्या उधळणीत भाकणूकीचा धार्मिक सोहळा बुधवारी पार पडला.
आबादेव वायकुळे ( फरांडेबाबा ) हे शिरसाव (ता.परांडा जि.उस्मानाबाद) या मूळ गावचे आहेत. फरांडेबाबा मानाच्या गादीवर विराजमान झाले. त्यांनतर 12 वाजण्याच्या सुमारास त्या गादीवरून उठून त्यांनी ‘हेडाम’ सोहळ्यात हातात तलवारी घेवून पोटावर वार करीत मंदिरात आले .यावेळी भंडार्याची उधळण करण्यात आली. त्यांनतर त्यांनी ढोल कैताळाच्या निनादात मंदिर परिसरात प्रवेश करून हेडाम खेळत मंदिराला प्रदक्षिणा घातली त्यांनतर मंदिरात प्रवेश करून मानकऱ्यांच्या उपस्थितीत भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.
या धार्मिक विधीस यात्रा कमिटीचे संजय पाटील ,गावचे लोकनियुक्त सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच रतन कारंडे, ग्राम विकास अधिकारी जी.डी. गिरीगोसावी, सर्व ग्रा प सदस्य, गाव कामगार तलाठी सुभाष बंडगर, गावातील मानकरी,समस्त धनगर समाज,ग्रामस्थ या सोहळ्यास प्रमुख उपस्थित होते. यात्रे वेळी गांधीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.