प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुलीला शासकीय नोकरीला लावण्याची बतावणी करून महिला पोलिसाने पतीच्या मदतीने प्रौढाला 4 लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अशोक विठ्ठल नाचणकर (58, मिरजोळे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार महिला पोलीस व तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी भारती ज्ञानदेव पाटील व विठ्ठल रामचंद्र पोवार (शंखेश्वर मधुबन, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अशोक नाचणकर यांची पोलीस कॉन्स्टेबल भारती पाटील व तिचा पती विठ्ठल पोवार यांच्याशी जानेवारी 2020 मध्ये ओळख झाली होत़ी यावेळी भारती व विठ्ठल पवार यांनी अशोक नाचणकर यांचा विश्वास संपादन करून तुमच्या मुलीला सेल्स टॅक्स ऑफिस येथे नोकरीला लावतो, असे आमिष दाखवल़े त्यासाठी पैशाची मागणी नाचणकर यांच्याकडे केल़ी
मुलीला नोकरीला लागणार, या आशेने नाचणकर यांनी भारती व विठ्ठल यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 12 जानेवारी 2020 रोजी रोख 2 लाख रूपये दिल़े त्यानंतर विठ्ठल यांच्या खात्यावर 1 लाख 49 हजार तर भारती हिच्या खात्यात 49 हजार रूपये जमा केले होत़े दरम्यान 4 लाख रूपये देवूनही मुलीला नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल़े त्यानुसार त्यानी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तकार दाखल केली आहे. जनतेचे फसवणुकीपासून रक्षण करण्याची अपेक्षा असलेल्या व्यक्तीकडूनच फसवणूक झाल्याच्या या प्रकाराची परिसरातही चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. पोलीस दलातीलच व्यक्तीविरुध्ध गुन्हा दाखल झाल्याने या बाबत कोणती व कशी कार्यवाही होते, या बाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.









