प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयाने कमी मनुष्यबळातही कोरोनापूर्वी आणि कोरोनामध्ये ही शासकीय रूग्णालयाच्या टीमने उत्तम कामगिरी बजावताना शासनाच्या कायाकल्प पुरस्कार प्राप्त केला आहे. मंगळवारी याची घोषणा आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
जिल्हा रूग्णालयाला शासनाचा कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याची घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली. जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना मानांकनानुसार हा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा रूग्णालयाच्या शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, डॉक्टर, कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे हा पुरस्कार शासनाच्यावतीने देण्यात आला आहे. या बाबतचे पत्र डेप्युटी डायरेक्ट हेल्थ डिव्हिजन, कोल्हापूर यांच्याकडून पाठवण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱयांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून हे यश मिळाले आहे.
जिल्हा रूग्णालयात गेली अनेक वर्षे वैद्यकीय समस्या आहे, मात्र वारंवार या बाबत पाठपुरावा अथवा प्रस्ताव लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून देवूनही अद्यापही डॉक्टरांची पदे भरली गेली नाही. अशाही परिस्थिती जिल्हा रूग्णालय कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱयांबरोबर टीमवर्क करत आहे. केवळ रूग्णांची सेवा नव्हे तर विविध उपक्रम घेतानाच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनही करण्याचे काम सिव्हीलकडून केले जाते. विविध आरोग्य दिन असतील तरी त्या दिवशी वेगळी जागरूकता निर्माण करण्याचे काम वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून केली जाते. शासकीय रूग्णालयात रूग्णसेवेसह रूग्णालयातील स्वच्छता, इतर सुविधा या बाबींची नोंद कायाकल्प पुरस्कार जाहीर करताना घेतली गेली आहे. कोरोना काळात तर शासकीय रूग्णालयाने केलेली कामगिरी इतर जिल्हय़ांसाठीही आदर्शवत आहे. जिल्हय़ात गेल्या महिनाभरापासून कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.