गौरीने आशीर्वचन दिल्याप्रमाणे आपल्या प्राणवल्लभाशी रत होण्यासाठी उषा मनोमन आतूर झाली. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील प्रदोषयुक्त द्वादशी आली. उषेने व्रतपूर्वक गौरीहराचे पूजन केले. साज शृंगार केला, सेज सजवली व ती आपल्या प्राणवल्लभाची उत्कंठतेने वाट पाहू लागली.
कुम्भाण्ड बाणमंत्री निका । त्याची कन्या चित्रलेखा। तिसी वृत्तान्त हा ठाउका । उषेच्या सख्या अनुकूळ जे। रजनी क्रमिलिया याममात्र । पहावया उषाचरित्र।
चित्रलेखा परम चतुर । आली सत्वर ते ठायीं ।
गौरीहरां करूनि नमन । स्मरूनि गौरीचें वरदान ।
उषा करिती झाली शयन । जागृत ठेवूनि चित्रलेखे ।
उपबर्हण घालूनि उसां । प्रावरण करूनि सूक्ष्मवासा ।
पहुडली साशंक हृदयकोशा । माजी परेशा चिंतूनी ।
उषा पहुडतां शेजेवरी । निद्रा लागली घटिका चारी ।
स्वप्न देखिलें तियेमाझारी । परमेश्वरीवरदानें ।
श्याम सुंदर पंकजाक्ष । लावण्य तरुण सगुण दक्ष ।
दिव्याभरणीं नर प्रत्यक्ष । देखिला वक्षःसंलग्न ।
उषेचे वडील बाणासुर यांचा कुम्भाण्ड हा प्रमुख मंत्री होता. त्याची मुलगी चित्रलेखा ही उषेची जवळची बाल मैत्रिण होती. तिला गौरीने उषेला दिलेल्या वराबद्दल सारे माहीत होते. जशी रात्र चढू लागली तशी उषेचे पुढे काय झाले हे पाहण्याकरिता चित्रलेखा उषेच्या शय्यागृहात आली. उषेने गौरीहराला मनोमन वंदन केले व चित्रलेखेला जागी ठेवून उषा मंचकावर पहुडली. लवकरच तिला गाढ झोप लागली. तिच्या स्वप्नात एक श्यामवर्ण अत्यंत सुंदर, तेजस्वी व बलवान युवक आला. उषा त्याच्याबरोबर शृंगारात रत झाली.
इतुका देखे चमत्कार । तंव झळकला प्रजागर ।
म्हणे केउता गेला चोर । स्मरमंदिर उघडूनी ।
मानसचिद्रत्नाची पेटी । स्मरसंगरिं उठाउठी ।
हरूनि गेला कवणे वाटीं । म्हणोनि दृष्टी हुडकितसे ।
म्हणे पाजूनि अधरामृत । रतिरसानुभव करूनि आतां। केउता गेलासि प्राणनाथा । दुश्चितचित्ता परिमार्गी । अरतें परतें दुरी जवळी । मंदिरिं चहूंकडे धांडोळी । लवूनि पाहे मंचकतळीं । तंव हांसे वेल्हाळीं चित्ररेखा। अवो चतुरे बाणतनये । मंचका तळीं पाहसी काय । कैसा वर्तला अभिप्राय । कथिती होय तो आम्हां । चित्रलेखा ऐसें बोले । तंव सखीमंडळ चेइरें झालें ।
उषेनें सलज्ज मौन धरिलें । अंतर व्यापिलें चिंतेनें ।
उठूनि बैसली सखियांमाजी। तंव त्या पुसती अपूर्व आजे । काय वर्तलें तयाची वाजी। करी समाजीं सखियांचे । तंव विरहें बहु व्याकुळा । सलज्ज बोलूं न शके बोला। अंतर जाणोनि सख्यांचा मेळा । दुरी वारिला चित्रलेखेनें ।
त्या सुंदर युवकाबरोबर उषेचा शृंगार चालू असतानाच सूर्योदय झाला आणि ती जागी झाली. स्वप्न निमाले तसा स्वप्नातील प्रियतमही दिसेनासा झाला. त्याबरोबर उषा सैरभर होऊन त्याला शोधू लागली. उषा मनोमन म्हणाली-माझे मनोमंदीर उघडून आलेला हा चोर गेला तरी कुठे? माझे चित्त तर याने चोरून नेले.
Ad. देवदत्त परुळेकर








