मनसेने घेतली शल्य चिकित्सकांची भेट : अनेक मुद्यांकडे वेधले लक्ष
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची भेट घेऊन खासगी रुग्णालयांत सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्व खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्याची मागणीही मनसेने केली.
जिल्हय़ातील काही खासगी रुग्णालयांमध्ये तपासणीच्या नावाखाली डॉक्टरांकडून लुट सुरू असून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त असून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून या खासगी रुग्णालयांवर कोणताही वचक नसल्याचे चित्र आहे, असे मनसेतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत जनतेतील असंतोष दूर होण्याच्या दृष्टीने आपण उचित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने काही कायदेशीर तरतुदी असलेल्या मुद्यांकडे लक्ष वेधले.
यामध्ये – काही खासगी रुग्णालयांत रुग्णांकडून अवास्तव फी आकारणी केली जात असून त्यावर आळा आणणे गरजेचे आहे. यासाठी मेडिकल कौन्सील ऑफ इंडियाने (MCI) निर्धारित केलेल्या नियमांनुसार सर्व खासगी रुग्णालयांत दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. शिवाय रुग्णालयांनी विविध घटकनिहाय तपासणीचे दर हे आपल्या रुग्णालयाच्या दर्शनी भागावर सुस्पष्ट लावावेत. काही रुग्णालये कर चुकवेगिरीसाठी बिल पक्क्या स्वरुपात न देता साध्या कागदावर देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांना GST नंबर असलेले पक्के बिल देण्याबाबतचे निर्देशित करण्यात यावे. रुग्णालयांत रुग्ण दाखल होत असताना उपचारांबाबतचे QUOTATION देणे बंधनकारक करावे, अशा सूचना मनसेच्या निवेदनात उल्लेखित आहेत. या मुद्यांबाबत तात्काळ अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी अन्यथा झोपलेल्या आरोग्य प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसे आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ सचिव राजेश टांगसाळी, अणाव सरपंच अमित इब्राहीमपूरकर, शैलेश अंधारी, रामा सावंत आदी उपस्थित होते.