सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या एका याचिकेवरील सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायमूर्ती यु. यु. ललित आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला ‘विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण कधी होणार?’ अशी विचारणा केली. मात्र, सरकारच्या भूमिकेबाबत महाधिवक्त्यांकडून समर्पक माहिती मिळू न शकल्याने पुढील सुनावणीवेळी ब्रिटनमधील सुनावणीच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा अहवाल देण्यासाठी सहा आठवडय़ाचा अवधी दिला आहे. आता याप्रकरणी जानेवारी महिन्याच्या प्रारंभी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या प्रत्यार्पण सुनावणीसंबंधी आपल्याला अधिक माहिती नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आले होते. ब्रिटनच्या न्यायालयात ‘गुपचुप’पणे (सिक्रेट) विजय मल्ल्यासंबंधीची सुनावणी सुरू असल्याचे सॉलिसिटर जनरलनी न्यायालयात स्पष्ट केले होते. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटन सकारात्मक असले तरी अद्यापही न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याने प्रत्यार्पण प्रक्रियेला गती आलेली दिसत नाही.









