प्रतिनिधी / पेठ वडगाव
भादोले (ता.हातकणंगले) येथील भादोले-लाटवडे दरम्यानच्या रस्त्यावर आठ ते नऊ फुटाचा अजगर सापडला. सर्पमित्र बाजीराव कमलाकर यांनी त्याला पकडून तो वनअधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला. इतका मोठा अजगर या परिसरात पहिल्यांदाच सापडला असून जंगलात आढळणारा हा अजगर या परिसरात कसा सापडला याचा निसर्ग मित्र अभ्यास करत आहेत.
भादोले येथील सर्पमित्र बाजीराव कमलाकर व गणेश कोळी दोघे मित्र लाटवडे गावास गेले होते. तेथील काम आटोपून रात्री दहाच्या सुमारास भादोले गावाकडे परतत होते. या दरम्यान, घाटगे विहीरीजवळ अचानक रस्त्यात अजगर रस्ता ओलांडताना त्यांना दिसला. हा अजगर दिसल्यावर लगेच मोटरसायकल बाजुला लावून या अजगराची शेपुट पकडून त्याला बाहेर काढले. हा अजगर पकडून एका पोत्यात घालून भादोले गावाचे सरपंच आनंदा कोळी यांना कळवले असता त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची सुचना दिली. या ठिकाणी रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार घटनास्थळी येवुन त्यांनी या अजगरास ताब्यात घेत कोल्हापुर येथील कार्यालयाकडे जमा केले. या अजगराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून या परिसरात गवा, मगर, अजगर सापडत आहेत. यापुर्वी गवा तीन वेळा आलेला होता. चांदोली अभयारण्य क्षेत्रातुन नदीचे पात्र येत असल्यामुळे या जंगलातील भरकटलेले प्राणी नदीच्या काढाने या परिसरात पोहोचतात असा अंदाज निसर्ग मित्रांनी व्यक्त केला.









