टिप्परने कारला धडक देवून फिल्मी स्टाईलने गोळीबार
विजापूर/बेळगाव
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून थंड असलेला भीमाकाठ सोमवारी पुन्हा हादरला आहे. महादेव भीमाशंकर भैरगोंड (वय 48) यांच्यावर विजापूर-सोलापूर महामार्गावरील अरकेरी तांडय़ाजवळ गोळीबार करण्यात आला आहे. या तुफान गोळीबारात महादेव सावकारचा नातेवाईक जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
दोन कुटुंबातील हाडवैरातून असलेला हा संघर्ष गेल्या 60 वर्षांपासून सुरू आहे. सोमवारी महादेव सावकार प्रवास करीत असलेल्या कारला प्रथम टिप्परने धडक मारण्यात आली. त्यानंतर तुफान गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण विजापूर जिल्हा हादरला आहे. गोळीबारानंतर मारेकर फरारी झाले आहेत.
बाबुराव मारुती कंचनाळकर (वय 63) हे जागीच ठार झाले आहेत. बाबुराव हे महादेव सावकारचे मित्र असल्याचे सांगण्यात आले. तर स्वतः महादेव सावकार भैरगोंड (वय 48, रा. उमराणी, सध्या रा. केरुर), खासगी सुरक्षा रक्षक जगवीरसिंग प्रेमसिंग (वय 36, रा. जम्मू), रमेश शर्मा (वय 39), हुसेनी बजंत्री (वय 29), कार चालक लक्ष्मण दिंडोरे (वय 27) असे पाच जण जखमी झाले आहेत.
सोमवारी दुपारी 3 ते 3.30 यावेळेत विजापूर-सोलापूर महामार्गावरील आरकेरी तांडाजवळ हा थरार घडला आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. राम लक्ष्मण अरसिद्दी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. महादेव सावकारसह सर्व पाच जखमींना बीएलडीई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार महादेव सावकारला पाच गोळय़ा लागल्या आहेत. तरीही तो बचावला असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. 10 ते 15 जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून महादेव सावकारचा नातेवाईक तम्माराव भैरगोंड यांनी या घटनेसंबंधी पोलिसांना माहिती दिली आहे.
पोलीस अधिकाऱयांनी किरकोळ जखमींची भेट घेवून त्यांच्याकडून माहिती घेतली असून डिझेल घालण्यासाठी आम्ही कार थांबविली होती. त्यावेळी टिप्परने महादेव सावकार असलेल्या कारला धडक देण्यात आली. अपघातानंतर 20 ते 25 जणांनी आमच्या कारच्या दिशेने तुफान दगडफेक केली त्यानंतर गोळीबाराला सुरूवात झाली, असे तम्मारावने सांगितले आहे.
भीमाकाठावर पुन्हा संघर्षाची चिन्हे
महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. याच दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर भीमाकाठावर पुन्हा संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. गँगवार भडकण्याचा धोका वाढला आहे. मल्लिकार्जुन चडचण व महादेव भैरगोंडा यांच्या घराण्यात 60 वर्षांपूर्वी झालेल्या वादातून आतापर्यंत अनेकांचे बळी गेले असून स्वतः मल्लिकार्जुन गंभीर जखमी आहे. रामदुर्ग तालुक्मयात (जि. बेळगाव) त्याच्यावर महादेव सावकारचा भाऊ पुत्राप्पा सावकार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. पोलीस वाहनातून बेळगावहून विजापूरला नेताना पोलीस वाहनावर गोळीबार झाला होता. तेंव्हापासून मल्लिकार्जुन गंभीर आहे. तरीही तो जीवंत आहे.
यासंबंधी तरुण भारतने जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल यांच्याशी संपर्क साधला असता दुपारी 3 ते 3.30 यावेळेत ही घटना घडली आहे. तीन कारमधून महादेव सावकार व त्याचे साथीदार चडचणहून जात होते. त्यावेळी टिप्परने महादेव सावकार असलेल्या कारला धडक मारण्यात आली आहे. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार 10 ते 12 जण होते. मारेकऱयांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून लवकरच त्यांच्या मुसक्मया आवळण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
धर्मराज एन्काऊंटर, गंगाधर हत्येच्या बदल्यासाठी हल्ला
महादेव सावकारवर कोणी गोळीबार केला याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल यांनी दिली आहे. मल्लिकार्जुन चडचणचा मुलगा धर्मराज चडचण (वय 32) व त्याचा लहान भाऊ गंगाधर चडचण (वय 30) यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मल्लिकार्जुनच्या साथीदारांनी हा हल्ला केला आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी इंडी तालुक्मयातील कोंकणगाव येथे धर्मराजचा एन्काऊंटर झाला होता. त्याचा भाऊ गंगाधर त्या दिवसापासून बेपत्ता होता. महादेव सावकारच्या सांगण्यावरुन पीएसआय गोपाळ हळ्ळूर व सीपीआय एम. बी. असुदे यांनी एन्काऊंटर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची सीआयडी चौकशीही झाली असून पोलीस अधिकाऱयांनाही अटक झाली होती. धर्मराजच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनीच गंगाधरला महादेव सावकारच्या ताब्यात दिले होते. त्यांनी त्याचा खून करुन मृतदेह भीमानदीत टाकल्याचे उघडकीस आले होते. याचा बदला घेण्यासाठी सोमवारचा थरार घडला आहे. पोलीस तपासानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.









