चापगाव / वार्ताहर
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात खानापूर तालुक्मयात झालेल्या धुवाधार पावसामुळे मलप्रभा नदीला महापूर आला होता. या महापुरामध्ये मलप्रभा नदीवरील चापगाव ते यडोगा रस्त्यावरील पाणी आडवण्याच्या बंधाऱयावरील दुतर्फा मातीचा भराव वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक गेल्या चार महिन्यापासून पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या दुचाकी वगळता या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद राहिल्याने अनेक वाहनधारकांसह ऊस उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. संबंधित विभागाकडे अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही तसेच लोकप्रतिनिधींना कळवूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पुलाचा वाली कोण? असा प्रश्न शेतकरी वर्ग व प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
हा रस्ता अनेक गावांना जवळचा असून तो बंद झाल्याने खानापूरला ये-जा करण्यासाठी आता लालवाडीमार्गे पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गोची झाली आहे. गेले चार महिने या पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा संबंधित अधिकाऱयांना अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी देखील घेण्यास नाकारत आहेत. त्यामुळे आपण दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित झाला आहे.
ऊस तोडणी कामगारांना मोठी अडचण
चापगाव, कोडचवाड, वड्डेबैलसह पुढच्या भागातील अनेक गावांचा ऊस खानापूर लैला शुगर कारखान्याला पुरवठा केला जातो. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ऊस तोडीला जोर आला आहे. परंतु यडोगा मार्गे लैला शुगर्सला येणारा जवळचा मार्ग बंद राहिल्याने आता ऊस वाहतूकदारांना 18 किलोमीटरचे अंतर कापून लालवाडीमार्गे खानापूरला येणे भाग पडत आहे. यामुळे ऊस तोडणी वाहतूकदारांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सदर रस्ता लैला कारखान्याला जाण्यासाठी केवळ सात ते आठ किलोमीटरचा असल्याने सर्वांना सोयीचा आहे. परंतु या रस्त्याच्या बंधाऱयावरील दुतर्फा मोठे भगदाड पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. रस्त्याच्या चापगावच्या बाजूने रस्ता उखडून गेला असून चारचाकी वाहने जाणे कठीण झाले आहे. तर यडोगा रस्त्याच्या बाजूने पुलावर टाकण्यात आलेल्या काँक्रिटीकरण खालील मातीचा भराव वाहून गेल्याने सिमेंट काँक्रीट अधांतरी राहिले आहे. यावरून ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने घालणे धोक्मयाचे बनले आहे. यासाठी तात्काळ या पुलावरील दुरुस्ती कामे हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अभियंत्याचा नाकर्तेपणा, कंत्राटदारही अडचणीत
या पुलाच्या दुरुस्तीसाठी मागील वषी 45 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीअंतर्गत या पुलावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु सदर काँक्रिटीकरण करताना लॉकडाऊन झाल्याने कामही बऱयाचवेळा रखडले. अखेर मध्यंतरी कंत्राटदाराने या पुलावरील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले खरे. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व बेजबाबदारपणामुळे या पुलाची महापुरात वाताहत झाली आहे. पुलावर कामकाज सुरू असताना बाजूने नाहक जेसीबीने खोदाई केल्याने पुराच्या प्रवाहात असलेला रस्ता वाहून गेला. तर दुसऱया बाजूने पुलाच्या प्रवाहामुळे नव्याने करण्यात आलेले काँक्रिटीकरणाखालील मातीचा भराव वाहून गेल्याने धोका निर्माण झाला आहे.
तात्काळ दुरुस्त न केल्यास आंदोलन
दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावी, अशी विनंती लघुपाटबंधारे विभागाचे अभियंते कोमन्नावर यांच्याकडे त्याचवेळी केली. परंतु कोमन्नावर यांना अन्यत्र बदली आदेश आल्याने सदर कंत्राटदाराचे बिलही रखडले आहे. तरी या पुलाची येत्या दोन दिवसात तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा संबंधित खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.
लैला शुगर्स महाव्यवस्थापकाकडे शेतकऱयांची धाव
इकडे लैला शुगर्स साखर कारखान्याला या भागातील ऊस पुरवठा केला जातो. परंतु ऊस वाहतुकीसाठी रस्त्यात अडचणी निर्माण झाल्याने या पुलाच्या दुतर्फा मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लैला शुगर्सचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांच्याकडे या भागातील शेतकऱयांनी विनंती केली आहे. एका शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी व्यवस्थापकांची भेट घेऊन कारखान्यामार्फत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोन दिवसात संबंधित विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर आपण तात्पुरता रस्ता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी शंकर धबाले, तुकाराम धबाले, मारुती चोपडे, पिराजी कुऱहाडे, फोंडू धबालेसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.









