वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या नीस शहरात चर्चमध्ये चाकूने वापर करणाऱया दहशतवाद्याच्या तिसऱया सहकाऱयाला पोलिसांनी अटक केली आहे. 33 वर्षीय हा आरोपी अन्य एका दहशतवाद्याचा नातेवाईक आहे. पोलिसांनी छाप्यादरम्यान त्याला त्याच्या घरातून जेरबंद केले आहे.
नीसमधील चर्चमध्ये गुरुवारी सकाळी 21 वर्षीय टय़ुनिशियन वंशाच्या दहशतवाद्याने चाकूने हल्ले केले होते. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या कारवाईत दहशतवादी जखमी झाला होता. गोळी लागल्यावर उपचार सुरू असताना दहशतवादी धार्मिक घोषणा देत होता, अशी माहिती नीसच्या महापौरांनी दिली आहे. फ्रान्स आणि टय़ुनिशियाच्या यंत्रणा याप्रकरणी तपास करत आहेत.
दहशतवाद्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी
नीस शहराच्या चर्चमधील हल्ल्यात सामील 21 वर्षीय टय़ुनिशियन नागरिकावर यापूर्वीही हिंसाचाराचे अनेक गुन्हे नोंद झाले होते. इब्राहिम ईसाओई याला इटलीतून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला होता. तेथून तो अवैध पद्धतीने फ्रान्समध्ये पोहोचला होता.
इटलीने नाकारला होता आश्रय
इब्राहिमवर टय़ुनिशियन अधिकारी किंवा गुप्तचर यंत्रणांचा कुठलाच संशय नव्हता. इटलीच्या पूर्णपणे भरलेल्या पुनर्वसन केंद्रांमध्ये त्याच्यासाठी कुठलीच जागा नव्हती., अशी माहती इटलीच्या गृहमंत्री लूसियाना यांनी दिली आहे.









