तरुणाईचा ऍस्ट्रोटर्फ मैदानावर खेळण्याकडे वाढतोय कल, शहरात 14 ठिकाणी आधुनिक बनावटीची मैदाने
कोल्हापूर / संग्राम काटकर
कोल्हापूरात फुटबॉल, क्रिकेटच्या सरावाचा ट्रेंड बदलता चालला आहे. माती-गवताच्या मैदानात जाण्याऐवजी आधुनिक ऍस्ट्रोटर्फ मैदानावर सरावासाठी जाण्याकडे तरुणाईचा कल वाढतच चालला आहे. दुसरीकडे टर्फ मैदानांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या 4-5 वर्षात शहर व परिसरात दोन-पाच नव्हे तर 14 ठिकाणच्या खासगी जागेत टर्फची मैदाने तयार झाली आहेत. जाड-जुड जाळ्यांनी बंदिस्त मैदानांवर दिवसाबरोबरच रात्रीही खेळता येईल, विद्यूत व्यवस्था आहे. तसेच मैदानांवर जास्तीत जास्त सराव करता यावा, यासाठी एका तासाची बॅचेसही केली असून 500 ते एक हजार रुपये भाडे घेतले जाते.
जोरदार पाऊस झाला की माती-गवताच्या मैदानांना तळ्याचे स्वरुप येणं. ओपन बार समजून तळीरामांच रात्री मैदानात बसणं, दारू पिऊन मैदानातच बाटल्या फोडून नामानिराळं होणं आणि बाटल्यांच्या काचा लागून खेळाडूंच जमखी होणं असे सगळे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडू लागले आहेत. त्यामुळे सामान्य व उच्चभ्रु वर्गातील खेळाडूंनी फुटबॉल, क्रिकेटच्या सरावासाठी मैदानांवर जाणेच बंद केले. सरावासाठी जायचे तर कुठे जायचे अशी भावनाही खेळाडूंमध्ये निर्माण झाली. अशा परिस्थितीतच छोटÎा आकाराची पण आधुनिक बनावटीच्या ऍस्ट्रोटर्फ मैदानाची संकल्पना अस्तित्वात आली. शहरातील पहिले टर्फ मैदान टाकाळा येथील जलतरण तलावाजवळ बांधले गेले. त्यानंतर पुढील 4-5 वर्षात श्री महाराणी लक्ष्मी जिमखाना (दसरा चौकनजिक), देवकर पाणंद, शाहू दयानंद हायस्कूल, फुलेवाडी रोडवरील अमृत हॉल, फुलेवाडी रिंग रोड, रुईकर कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय, कदमवाडी, जीवबा नाना जाधव पार्क, पाटोळेवाडी, शिरोली, गांधीनगर येथील खासगी जागांमध्ये मैदाने उभारली गेली. त्यांची माहिती जशी कळू लागली तसे खेळाडू याच मैदानांवर सरावासाठी जाण्यास प्राधान्य देऊ लागले. त्यामुळे माती-गवताची मैदाने खेळाडूं अभावी मोकळी-मोकळी राहू लागली. भविष्यात जर आणखी टर्फ मैदाने झाली तर माती-गवताची मैदान खेळाडूंअभावी ओस पडल्याशिवाय राहणार नाहीत.
मैदानांवर बसविलेले ऍस्ट्रोटर्फ मुंबईहून आयात.
50 ते 65 लाख रुपये टर्फचा खर्च
60 फुट रुंद आणि 100 फुट लांब असा मैदानांचा आकार
वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी 2 ते 3 लाख रुपये मोजावे लागतात
मैदान पुर्णपणे मोफत
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून पाच ठिकाणी ऍस्ट्रोटर्फ मैदाने उभारली जात आहेत. जुना बुधवार पेठ, स्वामी विवेकानंद हायस्कूल येथील तयार मैदान खेळाडूंसाठी खुलेही केले आहे. दुधाळी व जनता बझार (गांधी मैदान) मैदानाचे काम सध्या सुरु आहे. लवकरच राजारामपुरी शाळा 9 नंबर व मंगळवार पेठेतील महाराणी ताराराणी शाळा येथे मैदाने तयार केली जातील. जिल्हा नियोजन नाविण्यपूर्ण योजनेतून निधीही मंजूर आहे. येत्या 7 महिन्यात ही मैदाने तयार करुन ती खेळाडूंसाठी मोफत खुली केली जातील, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
क्षमता वाढविण्यासाठी ऍस्टोट्रर्फ मैदानच उपयोगी…
फुटबॉल आणि क्रिकेटच्या मैदानात टिकून राहून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी खेळाडूकडे मोठी क्षमता असावी असते. मातीच्या मैदानात सराव करुन अपेक्षित क्षमता वाढविणे थोड मुश्किल जाते. ऍस्ट्रोटर्फच्या मैदानावर मात्र सराव केल्यास खेळाडूच्या अंगात मोठी क्षमता निर्माण होते. एकदा का अंगात क्षमता निर्माण झाली की राज्यपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळाडूला मोठी कामगिरी करणे शक्य होते.