महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागात अस्वस्थता
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता भास्कर कुंभार यांनी पदभार सोडला आहे. आपल्याला कार्यमुक्त करावे, असे पत्र त्यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना पाठविले आहे. काही विशिष्ट नगरसेवकांकडून सतत मिळणारी अवमानास्पद वागणूक आणि कामाच्या ताणतणावातून कुंभार यांनी महापालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त होण्याचा निर्णय घेतल्याची पाणीपुरवठा विभागात चर्चा आहे. दरम्यान, कुंभार यांच्या धक्कादायक निर्णयानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांतही अस्वस्थता पसरली असून काही विशिष्ट नगरसेवकांकडून दिला जाणारा त्रास आणि कामातील ताणतणाव यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र जलप्राधिकरणाचे अभियंता असणारे भास्कर कुंभार हे महापालिकेच्या सेवेत आले होते. तत्कालिन जलअभियंता एस. व्ही. कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर त्यांची जागा पुंभार यांनी घेतली होती. जलअभित्यांचा पदभार सांभाळताना त्यांनी वितरण, डेनेज, मेकॅनिकल आणि प्रोजक्ट आदी विभाग हाताळले होते. थेट पाईप लाईन योजना, अमृत योजना आणि एसटीपी आदी प्रोजेक्टमधील कामे पूर्णत्वावर भर दिला होता. शहरातील पाणीपुरवठÎाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. पण गेले काही दिवस त्यांना उपनगरातील एक नगरसेवक आणि त्याचा भाऊ प्रभागात पाणी सोडण्याच्या कारणावरून बोलवून वारंवार अवमान करणे, अपशब्द वापरणे अशा पद्धतीने त्रास देत होता. इतरही काही विशिष्ट नगरसेवकांनी पुंभार यांना टार्गेट केले होते. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही कुंभार यांच्याशी थेट संबंधित नसलेल्या महापुरातील पाणीपट्टी सवलतीच्या मुद्दÎावरही सदस्यांनी त्यांना नाहक लक्ष्य केले होते. या सर्व प्रकारामुळे कुंभार त्रस्त झाले होते, अशी चर्चा पाणीपुरवठा विभागात आहे. दरम्यान, एकाचवेळी अनेक कामांची जबाबदारी, अपुरे असणारे अधिकारी, कर्मचारी, त्यातून निर्माण झालेला कामाचा ताण यामुळे कुंभार यांनी गुरूवारी आयुक्त डॉ. बलकवडे यांना पत्र पाठवून आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती केली. त्यानंतर ते महाराष्ट्र जलप्राधिकरणाच्या मूळच्या सेवेत जाणार आहेत.
पदमुक्त केलेले नाही ः आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे
दरम्यान, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जलअभियंता भास्कर कुंभार यांना रिलिव्ह (पदमुक्त) केले नसल्याची माहिती दिली.
नगरसेवकाकडून अपमानास्पद शब्द
साने गुरूजी परिसरातील एका अपक्ष नगरसेवकाने कुंभार यांना बोलवले होते. ते गेल्यानंतर त्या नगरसेवकाने कुंभार यांच्याबद्दल अवमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे नाराज झालेल्या कुंभार यांनी तडकाफडकी कार्यमुक्त करण्यासाठी आयुक्तांकडे अर्ज पाठविल्याची चर्चा आहे.
कुंभार यांचा मोबाईल बंद
जलअभियंता कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.









