पावस-मेर्वी-कुर्धे-गणेशगुळे परिसर भयमुक्त
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील मेर्वी परिसरात अनेक ग्रामस्थ, जनावरांवर हल्ला करणारा बिबटय़ा अखेर वनविभागाच्या पिंजऱयात जेरबंद झाला आहे. गेले काही महिने वनविभागाला चकवा देणारा बिबटय़ा जेरबंद झाल्याने पावस पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वनविभागानेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पावस-कुर्धे-जांभूळआड-मेर्वी परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजरे लावण्यात आले होते. बेहरे परिसरात झाडीमध्ये लावलेल्या पिंजऱयात 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. वनविभागाच्या कर्मचाऱयांना बिबटय़ा अडकल्याचे आढळून झाले. परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड व वनविभागाची सारी टीम तत्काळ बेहरे स्टॉप येथे पोहोचली. दरम्यान ग्रामस्थही तेथे जमू लागले होते. पिंजऱयामध्ये बिबटय़ा जेरबंद झाल्याचे पाहून साऱयांनाच सुखद धक्का बसला.
मेर्वी-पावस परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे या बिबटय़ाची मोठी दहशत होती. वाहनधारकांचा पाठलाग करणे, त्यांच्यावर हल्ले करून गंभीर जखमी करणे असे प्रकार घडले होते. अलिकडे तर शेतकऱयांच्या गुरांवर, पाळीव प्राण्यांवर देखील भरदिवसा हल्ले करण्याचे सत्र सुरू झाले होते. या पिसाळलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजनांद्वारे जंगजंग पछाडत होता. पण त्या उपाययोजनांना बिबटय़ाने सतत चकवा दिल्याने त्याची दहशत वाढून सारेच हैराण झाले होते.
सातत्याने होणारे बिबटय़ाचे हल्ले, हल्ले झाल्यानंतर तातडीने वनविभागाला निंमंत्रण, वनविभागाची बिबटय़ा पकडण्यासाठी मोहीम व काही दिवसातच अपयशी होऊन मोहिमेची समाप्ती हे सत्र वारंवार घडत होते. पिंजऱयांसह रेस्क्यू टीमच्या पॅमेऱयांनाही बिबटय़ा गुंगारा देत असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे होते. पिंजऱयात जेरबंद बिबटय़ाची पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याच्s आढळले. बिबटय़ा जेरबंद झाल्याची माहिती पंचक्रोशीत वाऱयासारखी पसरली. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर व्ही. क्लेमेट बेन, जिल्हाधिकारी-लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक पोपटराव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड व त्यांच्या कर्मचाऱयांनी ही कार्यवाही यशस्वी केली. जिल्हाधिकारी प्रशासन, वनविभाग (पश्चिम), वनविभाग (कोल्हापूर), संजयगांधी नॅशनल पार्क, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पत्रकार, स्वयंसेवी संस्था अशा साऱयांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले.
आतापर्यंत 8 हल्ल्यात 20 व्यक्ती जखमी
पावस, मेर्वी, गणेशगुळे, कुर्धे, जांभूळआड या भागात बिबटय़ाचे सातत्याने हल्ले सुरु होते. या परिसरातील आतापर्यंत एकूण 8 वेळा हल्ले झाले. ज्यात एकूण 20 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. जखमींना वनविभागामार्फत औषधोपचारासाठी अर्थसहाय्य म्हणून 5 लाख 75 हजार रुपयांची मदतही करण्यात आली आहे.









