संबंधित रुग्णावर दीर्घकाळापर्यंत राहू शकतो कोरोनाचा प्रभाव : किंग्स कॉलेज, लंडनच्या संशोधन अहवालात दावा
कोरोनाचे संक्रमण झाल्यावर पहिल्या आठवडय़ात 5 किंवा अधिक लक्षणे दिसल्यास रुग्णावर दीर्घकाळापर्यंत कोरोनाचा प्रभाव राहण्याचा तो इशारा मानला जात आहे. हा दावा किंग्स कॉलेज लंडनच्या संशोधनात करण्यात आला आहे. संक्रमणानंतर पहिल्या आठवडय़ात थकवा, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, बोलताना त्रास, स्नायू आणि शरीरदुखी यासारखी लक्षणे दिसल्यास लाँग कोविडचा धोका असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
दीर्घकालीन कोविडचा साइडइफेक्ट
कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या 4 ते 8 आठवडय़ांपर्यंत बरे होत नाही, अशा व्यक्तींमध्ये पोस्ट कोविडचा धोका वाढतो. पोस्ट कोविड म्हणजेच दीर्घकाळापर्यंत कोरोनाच्या साइड इफेक्टला तोंड देणे. रिकव्हरीनंतर अशा रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, स्नायुदुखी आणि अधिक थकवा यासारखी लक्षणे दिसत असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे.
40 हजार रुग्णांवर संशोधन
ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी कोरोनाच्या 40 हजार रुग्णांवर संशोधन केले आहे. यात ब्रिटन आणि स्वीडनचे रुग्ण सामील करण्यात आले. यातील 20 टक्के रुग्णांनी संक्रमणाच्या 1 महिन्यानंतरही पूर्णपणे बरे झाले नसल्याचे नमूद केले आहे. 190 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सलग 8 ते 10 आठवडय़ांपर्यंत दिसून आली. तर 10 रुग्णांना संक्रमणाच्या 10 आठवडय़ांपर्यंत त्रास झाला होता. ही प्रकरणे दीर्घकाळापर्यंत कोविडच्या प्रभावाची बाब सिद्ध करतात असे संशोधन दर्शविते.
हालचाली नियंत्रित ठेवा
कोरोनातून बरे झाल्यावर पुढील काही आठवडय़ांपर्यंत स्वतःच्या हालचाली नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. अधिक हालचाली थकव्याचे कारण ठरतात आणि आगामी काळात याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. सकस आहारासह योगासने करा, औषधे वेळेत घ्यावीत असे संशोधकांनी सुचविले आहे.
64 टक्के रुग्णांवर प्रभाव

कोरोनातून बरे होणाऱया 64 टक्के रुग्णांमध्ये अनेक महिन्यांपर्यंत विषाणूचा प्रभाव दिसत आहे. उपचारानंतरही रुग्ण श्वास घेण्यास त्रास, थकवा, अस्वस्थपणा आणि नैराश्याला तोंड देत आहेत. कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या 2 ते 3 महिन्यांनी हे प्रभाव दिसून येत आहेत, असे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
लाँग कोविड
लाँग कोविडची अद्याप कुठलीच शास्त्राrय व्याख्या नाही. कोविड-19 चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याच्या महिन्यानंतरही कोरोनाचा प्रभाव दिसून येणाऱया व्यक्तीत हा प्रकार आढळून येतो. कोविडमधून बरे झाल्यावरही लक्षणांचा दीर्घकालीन अनुभवच लाँग कोविड आहे.
लाँग कोविडला तोंड देणाऱया व्यक्तींमध्ये लक्षणेही वेगवेगळी असू शकतो. परंतु सामायिक लक्षण थकवा हे आहे. अशा रुग्णांमध्ये आतडे, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदयालाही नुकसान होऊ शकते. यांच्यात बरे झाल्यावर नैराश्य आणि अस्वस्थपणाची प्रकरणे दिसून येत आहेत. लाँग कोविड शब्दाचा वापर पहिल्यांदा एलिसा पेरेगो यांनी (युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधन सहाय्यिका) यांनी स्वतःच्या कोविड-19 अनुभवांना प्रसारित करताना केला होता.









