प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 10 जण बिनविरोध झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश कत्ती, माजी मंत्री उमेश कत्ती आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर उर्वरित सहा जागा देखील बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावषी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत 10 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. मात्र खानापूर, बैलहोंगल आदी ठिकाणी काही उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्याशी सतत संपर्क साधला असून त्या ठिकाणच्याही जागा बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी आम्ही गेल्या 15 दिवसांपासूनच चर्चा करत आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, अशी माहिती भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही यासाठी हालचाली गतीमान करणार आहे. 16 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
बिनविरोधमध्ये लक्ष्मण सिद्धाप्पा सवदी (अथणी), आण्णासाहेब मारुती कुडीगुडी (रायबाग), आण्णासाहेब शंकर ज्वोल्ले (चिकोडी), रमेश विश्वनाथ कत्ती (हुक्केरी), शिवानंद सिद्धाप्पा डोणी (गोकाक), राजेंद्र चंद्रकांत अंकलगी (बेळगाव), विश्वनाथ उर्फ आनंद चंद्रशेखर मामनी (सौंदत्ती), अशोक रामचंद्रगौडा अवक्कण्णावर (आयएपीसीएमएस विभाग-अथणी), निळकंठ बसवराज कप्पलगुद्दी (कंज्युमर सोसायटी विभाग), सुभाष गिऱयाप्पा ढवळेश्वर (औद्योगिक संस्था), पंचनगौडा बसनगौडा द्यामनगौडर (दूध संकलन संस्था) आदींचा समावेश आहे.
शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. या पत्रकार परिषदला उमेश कत्ती, महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले, खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले, इराण्णा कडाडी, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित होते.









