काणकोण न्यायालयाचा निवाडा : मारहाण, धमकीचे प्रकरण
प्रतिनिधी / मडगाव
धमकी दिल्याच्या एका प्रकरणातील पुरावा न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे यापूर्वीच दोषी ठरविण्यात आलेल्या न्यायालयाने गोव्याचे माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना मंगळवारी शिक्षा ठोठावली. कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा आणि दंड अशा स्वरुपाची शिक्षा काणकोणच्या न्यायालयाने ठोठावली आहे.
माजी मंत्री मिकी पाशेको यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा मडगावच्या न्यायालयाने ठोठावली होती. त्यानंतर राजकारण्याला शिक्षा देण्यात आलेली अलीकडच्या काळातील ही पहिलीच शिक्षा आहे. काणकोण न्यायालयाचे न्यायाधीश अवधी शानूर यांनी काल बुधवारी 28 रोजी हा निवाडा दिला.
कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा
न्यायालयाने आरोपी रमेश तवडकर यांना भारतीय दंड संहितेच्या 352 कलमाखाली (मारहाण करणे) आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली. त्याचप्रमाणे मारहाण केल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निवाडय़ाच्या 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरावी. त्याचप्रमणे दोन्ही गुनह्य़ांसाठी दिलेली कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा एकाचवेळी भोगावी असा आदेशही या न्यायालयाने दिला. 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याची कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
दहा हजारांची भरपाई नाझिरकडे द्यावी
याशिवाय 30 दिवसांच्या आत आरोपीने 10 हजार रुपये भरपाई म्हणून न्यायालयाच्या नाझिरकडे भरण्यात यावे. नाझिरने ही 10 हजार रुपयांची रक्कम तक्रारदार पुनो वेळीप यांना अपीलाच्या कालावधीनंतर देण्यात यावी, असेही न्यायालयाने आपल्या निवाडय़ात म्हटले आहे.
रमेश तवडकरांच्या विरोधात होते तीन आरोप
माजी मंत्री रमेश तवडकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली तीन आरोप होते. 341 (अडविणे), 352 (मारहाण करणे) व 506 (2) (जीवे मारण्याची धमकी देणे) हे ते आरोप होते. काणकोण पोलिसांनी काणकोण न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र सादर केले होते.
दोन आरोप न्यायालयात झाले सिद्ध
साक्ष व पुरावे यावर आधारुन न्यायालयाने ‘मारहाण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्यासंबंधीचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र ‘अडविले’ हा भारतीय दंड संहितेच्या 341 कलमाखालील आरोप न्यायालयात सिद्ध होऊ न शकल्याने न्यायालयाने या आरोपातून तवडकर यांना संशयाचा फायदा देऊन या निर्दोष मुक्त केले होते.
खटल्याची पार्श्वभूमी
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार काणकोण परिसरातील पुनो वेळीप हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. पुनो वेळीप हे आपल्या एका मित्राबरोबर दुचाकीने चावडी – काणकोण येथे जात होते. तीन तळे गुळय़ाजवळ ते पोहोचले तेव्हा पाठीमागे एक पांढऱया रंगाची कार येत असल्याचे दिसून आले. कारमध्ये संशयित रमेश तवडकर बसलेले होते. वेळीप यांना दुचाकी थांबविण्याची सूचना तवडकर यांनी दिली. मात्र या सूचनेकडे त्यानी लक्ष दिले नाही. काही वेळाने पाठीमागून येणाऱया कारने दुचाकीला ओव्हरटेक केली आणि दुचाकीसमोर कार उभी करण्यात आली. रमेश तवडकर यांनी आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे पुनो वेळीप यांनी काणकोण पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत म्हटले होते.









