रवींद्र भवनच्या अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव शहराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. तो जतन करण्यास आपले प्रथम प्राधान्य राहिल अशी माहिती फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपचे राज्य सचिव दामू नाईक यांनी मडगाव रवींद्र भवनच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्यानंतर बोलताना दिली. सद्या कोरोना महामारीचा काळ सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर रवींद्र भवनचा ताबा घेणे हे आपल्यासमोर आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण गावडे यांनी सोमवार दि. 26 रोजी दामू नाईक हे रवींद्र भवनचे अध्यक्ष असतील असा आदेश जारी केला. या वेळी रवींद्र भवनच्या समितीत उपाध्यक्षपदाला बगल दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दामू नाईक हे स्वता कलाकार असून त्यांना साहित्याची देखील आवड आहे. या पूर्वी मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनिय कामागिरी केली होती. अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले होते. त्यात दरवर्षी आषाढी एकादशीला ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांना भक्ती संगीताची मेजवानीच दिली होती. त्यानंतर नाटय़स्पर्धा, इतर अनेक कार्यशाळा, व्याख्यान माला असे विविध उपक्रम रवींद्र भवनच्या माध्यमांतून राबविले होते. सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता, विविध उपक्रमांसाठी लागणारा निधी श्री. नाईक यांनी स्वता उभा करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने देखील भरघोस पाठिंबा दिला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आव्हानच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्ता योग्य निर्णय घ्यावे लागतील. सद्या अनेक आव्हाने आहेत. खास करून आर्थिक बाजूच्या संदर्भात. त्यात सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी एका वर्षाचाच कालावधी आहे. त्यात लोकांचा असा प्रतिसाद मिळतोय यावर देखील खुप काही अवलंबून असेल. 23 ऑक्टोबर पासून सिनेमा थिऐटर खुले झाले आहेत. पण, प्रेक्षक त्या ठिकाणी जाण्याचे टाळतात. हे सुद्धा लक्षात घ्यावे लागणार आहे. सद्या तरी आपल्याला प्रशासकीय भूमिका बजावावी लागेल. काही कठोर निर्णय देखील घेणे भाग पडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.









