दोघांवर गुन्हा, खेड पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / खेड
मुंबई – गोवा महामार्गावरील भरणेनजीक बेकायदेशीररित्या खैर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक येथील पोलिसांनी पकडला. लाखो रूपये किंमतीच्या खैर साठ्यासह ट्रक पोलिसांनी जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी दोघेजण फरारी असून रविवारी पहाटे गस्तीदरम्यान येथील पोलिसांनी ही कारवाई केली.
संदेश भिसे, अरविंद काते ( रा. मंडणगड ) या दोघांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एम.एच. ०४ / एच १६४८ या मालवाहू ट्रकमधून अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक सुरु होती. हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना भरणे येथे गस्तीदरम्यान अडवत ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये लाखो रुपये किमतीचा सोललेला खैराचा साठा आढळला असून याचा कुठलाही परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी ट्रकसह खेर लाकूड साठा जप्त केला. हा खैर लाकूड साठा नेमका कुठून आला व कुठे जात होता? याची येथील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ट्रकमध्ये नेमका किती रुपयांचा खैर लाकूड साठा होता, याचा तपशील उपलब्ध होवू शकला नाही.