एस.टी.बस आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात चार जण ठार, एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू-तीन जण गंभीर जखमी, मृत आणि जखमी विक्रमनगर, कोल्हापूर येथील एकाच कुटुंबातील-
कळंबे तर्फ कळे : येथील एस.टी. बस आणि इनोव्हा कारच्या अपघातात चक्काचूर झालेली वाहने
वार्ताहर / वाकरे
कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावर कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) नजिक एस.टी.बस आणि ईनोव्हा कारच्या भीषण अपघातात एकाच माळवे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान हा अपघात झाला.
अपघातातील मृत आणि जखमी विक्रमनगर ,कोल्हापूर (मूळ गाव कळे) येथील एकाच माळवे कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये आक्काताई दिनकर माळवे (वय 65), त्यांचा मुलगा संजय दिनकर माळवे (45) नातू करण दीपक माळवे (वय 27), सून पूजा संजय माळवे (वय 45) यांचा समावेश असून गंभीर जखमीमध्ये नातू समर्थ संजय माळवे (वय 16), सून नंदा दीपक माळवे (वय 40) आणि मुलगी सुनिता भगवान चौगुले ( वय 50) रा. विक्रमनगर कोल्हापूर यांचा समावेश आहे.
या अपघाताबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की मूळ कळे (ता. पन्हाळा) येथील आणि सध्या विक्रमनगर कोल्हापूर येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या माळवे परिवारातील आक्काताई माळवे यांच्या जाऊबाई आणि मावस बहिण साऊबाई पांडुरंग माळवे (रा. कळे) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी माळवे कुटुंबीय विक्रमनगर येथून सकाळी 10 च्या सुमारास इनोव्हा कारने कळेकडे जात होते. याचदरम्यान कणकवली आगाराची कणकवली- कोल्हापूर -लातूर ही एस.टी. बस गगनबावडा- कळेमार्गे कोल्हापूरकडे येत होती. कळंबे तर्फ कळे गावाच्या पूर्वेकडील वळणावर एका डंपरला ओव्हरटेक करून ही एस.टी. बस पुढे जात असताना समोरून येणाऱया इनोव्हा कारशी या बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की एस.टी. बसने इनोव्हा कारला सुमारे दहा फूट पाठीमागे रेटले.या धडकेमुळे इनोव्हा कारचे बोनेट आणि इंजिनचा चक्काचूर झाला.या इनोव्हा कारमधून माळवे परिवारातील 7 सदस्य जात होते. कळंबे तर्फ कळे फाट्यावर थांबलेल्या युवकांनी आणि नागरिकांनी अपघातानंतर त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि कारचा दरवाजा उघडून इनोव्हा कारमधील मृत आणि जखमींना बाहेर काढले. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात एस.टी.बस एका डंपरला ओव्हरटेक करताना कारवर धडकल्याने झाल्याचे सांगितले. या नागरिकांनी त्वरित याची माहिती 108 अंब्युलन्स दिली. कळे, सांगरूळ, सीपीआर रुग्णालयातील तीन अंब्युलन्स त्वरित अपघातस्थळी दाखल झाल्या. या अंब्युलन्समधून जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जागीच मृत झालेल्यामध्ये आक्काताई दिनकर माळवे (वय 65), मुलगा संजय दिनकर माळवे (वय 45), नातू करण दीपक माळवे (वय 27) यांचा समावेश आहे. गंभीर जखमीमध्ये सून पूजा संजय माळवे (वय 36), नातू समर्थ संजय माळवे (वय 16), सून नंदा दिपक माळवे ( वय 40), मुलगी सुनीता भगवान चौगुले (वय 50) यांचा समावेश असून गंभीर जखमी असणाऱया पूजा माळवे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या 4 झाली असून मृत आणि जखमी एकाच परिवारातील आहेत. त्यामुळे ऐन दसरा सणाच्या तोंडावर माळवे कुटुंबावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती कळंबे तर्फ कळे येथील पोलीस पाटील सौ. सरिता उत्तम पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. दरम्यान अपघातातील वाहने रस्त्याच्या मधोमध असल्याने कळे आणि कुडित्रे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. करवीर पोलीस दीड तास उशिरा घटनास्थळी पोहोचले. दरम्यान नागरिकांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह कापडाने झाकून रस्त्यावर ठेवले. करवीर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शासकीय रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि अपघातातील मृतांबाबत शोक व्यक्त केला. अपघातानंतर करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तत्पूर्वी करवीरचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण आणि कळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.सायंकाळी उशिरा चारही मृतांवर कळे (ता. पन्हाळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातग्रस्त बसचा चालक इरफान दगडू मुल्लाणी (वय 35, रा. कणकवली) आणि वाहक अशोक शंकर पुजारी (वय 32 रा. जुना बुधवार रोड, लक्ष्मीनगर, सांगली) हे करवीर पोलिसात हजर झाले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
झाडांमुळे अपघातांची मालिका–
कळंबे तर्फ कळे गावाच्या पूर्वेकडील बाजूस वळणावर रस्त्याकडेला उंचच उंच झाडे असून या झाडांमुळे दोन्ही बाजूंनी येणाऱया वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळेच याठिकाणी वारंवार अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडे त्वरित तोडावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
माळवे कुटुंब उध्वस्त
माळवे परिवारातील एका महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना आई ,मुलगा, सून, नातू अशा 4 जणांचा मृत्यू झाला असून एक सून, नातू आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या अपघातात संपूर्ण माळवे कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहे.
वाकरे फाट्यानजीक अपघाताची आठवण
यापूर्वी वाकरे फाट्यानजीक गतवषी दुचाकी आणि एका वाहनाच्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलांचा दसऱयाच्या सणाच्या तोंडावर अपघाती मृत्यू झाला होता. या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.
अपघातात इन्होवाचा चक्काचूर
हा अपघात इतका भीषण होता की अपघातात इनोवाचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले असून बॉनेट आणि इंजिनचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर कळंबे गावातील अनेक तरुण आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली..








