राज्यातील 45 तालुके अधिसूचित यादीत : भूजल पातळी घटल्याने निर्बंध
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील भूजल पातळीत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याने बेळगावसह 15 जिल्हय़ांतील अधिसूचित प्रदेशांमध्ये पुढील आदेशापर्यंत नव्या कूपनलिका खोदण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्याच्या लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारित कार्य करणाऱया कर्नाटक भूजल प्राधिकरणाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
भूजल प्राधिकरणाच्या अधिसूचनेसुसार राज्यातील 15 जिल्हय़ांतील 45 तालुक्यांना अधिसूचित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमधील भूजल पातळीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.
त्यामुळे येथे नव्या कूपनलिका खोदण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय येथील भूजलाचा वापर करणाऱयांनी सक्तीने नोंदणी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. राज्यातील बेळगाव, बागलकोट, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, बळ्ळारी, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, गदग, कोलार, रामनगर, हासन, तुमकूर व चिक्कमंगळूर जिल्हय़ातील 45 तालुक्यांमध्ये नव्या कूपनलिका खोदण्यावर राज्य भूजल प्राधिकरणाने बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास जमीन मालक आणि कूपनलिका खोदकाम करणाऱया मालकाला दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे प्राधिकरणाने आदेशाद्वारे सांगितले आहे.









