अगदी अलीकडे एस. पी. बालसुब्रमण्यम् यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर भरपूर लेखन समाजमाध्यमांवर धबधब्यासारखे कोसळले. अक्षरशः सडा पडला. काय वाचावे आणि किती वाचावे असा प्रश्न पडेल इतके लिहिले गेले. त्यांनी असंख्य गाणी गायिली आहेत. त्यात काही गाणी अतीव प्रसिद्धीस आली जी जणू सिग्नेचर म्हणून ओळखली जातात. आकाश केसरिया रंगात रंगलेले असते. ज्ञात जगाला अगोचर जगाशी जोडणाऱया अदृश्य धाग्यांचे अस्तित्त्व जाणवू लागण्याची वेळ असते. मनही जाणिवा आणि नेणिवा यांच्या सीमारेषेवर उभे असते. आपल्यातला ‘मी’ कुठे आहे शोधताना जेव्हा आ के तेरी बाहों में । हर शाम लगे सिंदूरी चे स्वर तनामनावर सांजेचा रंग मनसोक्त उधळीत येतात. अशावेळी आपण आपले रहातच नाही. त्या सुरांच्या प्रवाहावर आपले अस्तित्व अलगद सोडून देतो. मनात संध्याकाळची ती तरलता पेरण्याचे काम तर गाणे करतच असते आणि दिवस पुसला जात असतो. संध्याकाळ आणि गाणे हे मिश्रणच अजब आहे. सुप्रसिद्ध कवी बाकीबाब बोरकरांच्या या विषयावरच्या खूप कविता आहेत. त्यांची गाणीही झाली आहेत. पण आजपर्यंत सलग आणि सतत गाजत आलेले त्यांचे गाणे म्हणजे तुजी गो पायंजणा त्या दिसां वडाकडेन गडद तिनसना मंद मंद वाजत आयलीं तुझी गो पायंजणा! या गाण्याने अनेकांवर गारुड केले आहे. ती कविता अनेकांनी गायिली. ऐकताना वाटतेही छान…पण पुलंच्या आवाजात ते गाणे विलक्षण वाटते. गाणाऱयाच्या आवाजातल्या अभिव्यक्तीत काय ताकद असते. कुठल्याही वाद्यांच्या साथीशिवायचे ते रेकॉर्डिंग आपल्याला ‘त्या’ वयोवृद्ध प्रेमवीराकडे घेऊन जाते. अक्षरशः मेस्मराइज होतो आपण! मग वड दिसतो, पैंजणाचा मधुर झणत्कार करीत येणारी ती दिसते, तिच्या साथीने मिळालेले चंद्रलोक दिसतात.. आहाहा… हीच सांजवेळ अजून जरा पुढे सरकली की पद्मजा फेणाणी यांच्या आवाजातले एक किंचित कमी प्रसिद्ध झालेले एक अप्रतिम गाणे आठवते. सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या सावल्यांत हरवुनि वाट विसरल्या! काळोख पडता पडताची ती वेळ दाखवणारे ते झुळझुळते सूर… आणि अर्थाच्या दृष्टीने कॅलिडोस्कोपसारखे वाटत जाणारे ते गाणे. ती कविता एकतर संध्याकाळ समर्थपणे दाखवते आणि वर पद्मजाताईंचे स्वरही ती कोडी वाढवत राहतात. अस्वस्थ सांज उतरत जाते मनात. काही केल्या जात नाही. ती उदासी फारच गडद होत गेली तर मग एकाएकी किर्र बोलते घन वनराई / सांज सभोती दाटून येई / सुखसुमनांची सरली माया / पाचोळा वाजे / जिवलगा राहिले रे दूर घर माझे मध्ये असलेला पूरियाधनाश्री अक्षरशः काळजाचे पाणी पाणी करत निर्दयपणे पलीकडे निघून जातो…सांजवेळ ही कातरवेळ. एकूणच उदास, दुश्चित करून सोडणारी असते. त्यात जर आपली बाळं घरी नसतील तर ती आई अधिकच कातर होते. आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या । जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या हे गाणे जन्माला येते. त्यातील दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर या ओळीत काय स्वर लागले आहेत लताबाईंचे! दाही दिशांनी गिळायला येणारा अंधार गाण्यातून साक्षात उतरला आहे. प्रतिमांची श्रीमंती आहे या गाण्यात! तिन्हीसांजेची वेळ वाकडी ही खरीच, पण शेजारी नणदेची झोपडी असली तर मग अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. पूर्वीच्या काळी खुद्द नवरा-बायकोही घरातल्या माणसांसमोर एकमेकांशी बोलू शकत नसत. म्हणून मग अशी तिन्हीसांजेची वेळ शोधून त्यांना चक्क चोरून भेटावे लागे. पण प्रियकर तर तिला सोडायला तयार नाही. मग तिला, अहो सजणा, दूर व्हा ना! जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या! अशी विनवणी करावी लागे. त्याच गीतात हे संध्याकाळचे वर्णन आहे. सूर्य मावळण्याची वेळ म्हणजे संध्याकाळ. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात पण मावळत्या सूर्याकडे पाहणारे कमी! राजकवी भा.रा. तांबे यांना हेच मनात आले की काय कोण जाणे पण ‘मावळत्या दिनकरा’ हे अजरामर गीत यातूनच जन्मले. स्वर अर्थात लतादीदी…
अंताक्षरीत पटकन वापरले जाणारे शाम ढले खिडकी तले तुम सीटी बजाना छोड दो आठवते का? नटखट नायक, लाजरी बुजरी नायिका आणि तीच ती ‘शाम ढले’ ची वेळ! लपायला सोयीचे पडावे म्हणून ती वेळ निवडून तिच्या घराच्या खिडकीपाशी येऊन शिट्टी मारणारा तो आणि तसे करू नये म्हणून समजावणारी ती! एकदम सुपरफाइन सीन! दिन ढल जाए हाये रात न जाय ची तर बातच न्यारी.. खरेतर ते उदास वाटणारे विरहगीत आहे. देव आनंदचा तो मुद्राभिनय आणि स्टाइल ग्रेटच आहेत.. ढल जाए मधल्या ढ।़ल या शब्दावरची कलाकुसर जीव घेत जाते. दिवसाचे ढळत जाणे, इच्छांचे ढळत जाणे, एकूणच उतरण आणि मग अपरिहार्यपणे येणारा अंधार तेवढय़ा इवलुशा जागेतून साकारतो. तशीच जागा परत तू तो न आये मधल्या तो।़ वर अचूक येते आणि तिचे न येणे आणि त्याच्या आयुष्यातली ती पोकळी त्या एका जागेतून इतकी दिसते ना! स्वर चित्रदर्शी आहेत इथे. आणि ते हुबेहूब उभे करणारी गायक व्यक्तीही धन्य धन्य! रफीसाहेबांचा सुवर्णस्पर्श आहे तो! संध्याकाळचे अप्रतिम अचूक वर्णन करणारे आणि ऐकणाऱयाला नॉस्टॅल्जिक करणारे एक अजून गाणे आहे. वो शाम कुछ अजीब थी राजेश खन्ना आणि किशोरदा! याहून अधिक काहीही बोलायची गरजच नाही. चितचोर या हलक्मयाफुलक्मया प्रेमपटात अमोल पालेकर आणि झरीना वहाब यांच्यावर चित्रित झालेले जब दीप जले आना हे गाणे घनगहिऱया खर्जयुक्त आवाजाचे धनी असलेले प्रसिद्ध गायक येसुदास यांनी हेमलतासोबत गायिले आहे. ऐकता ऐकता मनात सांजेचे दीप उजळत उजळत येतात.
अनिश्चिती हे संधिकाळाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळेच ती हुरहूर, अपुरेपण अशा गाण्यांमधून बऱयाचदा व्यक्त होत जाते. मारवासारखे संधिकालीन राग या अधांतराच्या तत्त्वावरच विकसित झाले आहेत. म्हणूनच त्यात असणारा अचल स्वरांचा अगदी अल्प वापर, मींडकामातून दाखवला जाणारा व्याकूळ भाव आणि तगमग, तळमळ, अपुरेपण दाखवणारा भाव हीच त्यांची खासियत आहे. सायंकाळचे यथार्थ चित्रण यातून होते ते उगीच नाही. पण तीच वेळ उजळून सोडणारी काही कालजयी गीतेही झाली आहेत. अभिषेकीबुवांनी गायलेले दिवे लागले रे दिवे लागले/ तमाच्या तळाशी दिवे लागले हे मन लख्ख उजळून टाकणारे गाणे म्हणजे सर्वांर्थाने कमाल आहे. या गाण्याचे अर्थगर्भ शब्द, त्याची ऐकायला अतीव अवीट मधुर वाटणारी परंतु अतिशय जटिल असणारी चाल आणि ती गाणारे खऱया अर्थाने महागायक असणारे अभिषेकीबुवा हा त्रिवेणी संगम आहे. खरेतर ही पहाटेची वेळ दाखवली आहे. परंतु तिन्हीसांजांपैकी ही पहिलीच सांज अर्थात संधिकालच. फक्त दिवस उजाडण्यापूर्वीचा संधिकाल. दिवाळीच्या पहाटेचे घन अरण्यातल्या वाटेवरचे गडद धुके, कणाकणाने जवळ येणारा उषःकाल आणि पावलागणिक उजळणारे अगदी छोटे छोटे दिवे असेच चित्र समोर येते ते गाणे ऐकल्यावर. आणि आपण शिकतो सांजेची एक वेगळीच धून… आणि चक्र सुरूच राहते. तिन्हीसांजेचे, ज्याला अंतच नाही.
अपर्णा परांजपे-प्रभु








