प्रतिनिधी / कणवकली:
कणकवली नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यावर ही निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणूक प्रक्रियेकडे विरोधी सदस्यांनी मात्र पाठ फिरवली. नूतन उपनगराध्यक्ष हर्णे यांचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले.
कणकवली उपनगराध्यक्षपदी गणेश हर्णे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याकडे दाखल झाले. त्यामुळे पीठासन अधिकारी तथा कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी हर्णे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडीपूर्वी पीठासन अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करत पीठासन अधिकाऱयांनी हर्णे यांचे नाव जाहीर केले.
हर्णे यांचे नगराध्यक्ष नलावडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोटय़ा सावंत आदींनी अभिनंदन केले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, विराज भोसले, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, बंडू गांगण, उर्वी जाधव, प्रतीक्षा सावंत, शिशीर परुळेकर आदी उपस्थित होते.
कणकवली शहर विकासाचा अभ्यास असलेल्या हर्णे यांच्या नावावर उपनगराध्यक्ष म्हणून बुधवारी सकाळीच सत्ताधारी भाजप पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे धक्कातंत्र वापरणार की हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कणकवली नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास व शहराचे राजकारण चांगलेच माहीत असलेले राजकारणी अशी ओळख असलेल्या हर्णे यांच्या नावावरच राणे यांनी शिक्कामोर्तब केले.
निवडीनंतर हर्णे म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांनी विश्वास दाखवित माझ्यावर जी जबाबदारी सोपविली, ती निश्चितच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करेन. शहराच्या विकासाच्यादृष्टीने माझे जास्तीत जास्त योगदान राहील.









