प्रतिनिधी/खेड
खेड नगर परिषदेच्या दवाखान्यात मोठा गाजावाजा करत कोविड सेंटरचे उद्घाटन करून केवळ जनतेची फसवणूक केली असून हे कोविड सेंटर फक्त नावापुरतेच असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील एकविरानगर येथील नगर परिषदेच्या दवाखान्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. कोविड सेंटर सुरू करण्यापूर्वी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग उपलब्ध करणे आवश्यक होते. मात्र एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मंजूर नसतानाही थाटामाटात कोविड सेंटरचे उद्घाटन करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जनता होरपळत असताना हे लोकप्रतिनिधी नेमके होते कुठे? असा सवालही उपस्थित केला आहे. खासदार तटकरे यांना येथील जनतेच्या आरोग्याची काळजीच नव्हती. याचमुळे त्यांना कोविड सेंटरच्या उद्घाटनास येण्यासच फक्त सवड मिळाली. बंदावस्थेतील रूग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र ही बाब गांभीर्याने न घेता येथील रूग्णांची एकप्रकारे क्रूर चेष्टाच केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी मुख्याधिकारी शिंगटे यांच्यासमवेत कोविड सेंटरची पाहणी करत गैरसोयींबाबत चर्चा केली. याप्रसंगी काँग्रेसचे अनिल सदरे, संदीप धारिया, फैसल देसाई, विनय जैन, शमशुद्दीन खान, हसनमिया रिफाई, समीर कौचाली आदी उपस्थित होते.









