वृत्तसंस्था/ दुबई
रविवारी झालेल्या आयपीएलमधील रोमांचक लढतीत विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सवर दुहेरी सुपरओव्हरमध्ये विजय मिळविल्याने मनोबल उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबची लढत मंगळवारी आणखी एक बलाढय़ संघ दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल.
या मोसमाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात पंजाबला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मागील दोन सामन्यात त्यांना निसटता विजय मिळविण्यात यश आले आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्यांना शेवटच्या दोन षटकांत 7 धावांची गरज असताना त्यांच्याकडे 9 गडी शिल्लक होते. मात्र सोपे आव्हान असूनही त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी झगडावे लागले होते. त्यानंतर मुंबईविरुद्ध रविवारी दोन सुपरओव्हर्सनंतर त्यांना विजय मिळविण्यात यश आले. निर्धारित षटकातच पंजाबला हा विजय मिळविता येणे शक्य होते. दोन सुपरओव्हर्समध्ये झालेला हा आयपीएलमधील पहिला होता.
डेथओव्हर्समधील गोलंदाजी आणि ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म ही पंजाबची प्रमुख चिंता बनली आहे. अशा परिस्थितीत प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकणे आवश्यक बनले आहे. विशेष म्हणजे या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणारे दोन फलंदाज (राहुल 525 व अगरवाल 393) पंजाब संघाचेच आहेत. मात्र त्यांच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे गेलचे संघातील पुनरागमन. तो सामील झाल्यामुळे सलामीला राहुलवरील ओझे थोडे कमी झाले असल्याने तो आता मुक्तपणे फलंदाजी करू लागला आहे. निकोलस पूरनने आपली स्फोटकता वेळोवेळी दाखवून दिली आहे. मात्र त्याला मॅचविनिंग खेळी अद्याप करता आलेली नाही. त्यामुळे मॅक्सवेलवरील दडपण वाढत आहे. पॉवरप्लेमध्ये स्पिनर गोलंदाजी करीत असताना मॅक्सवेल जास्त उपयुक्त ठरतो. असे असले तरी मंगळवारच्या सामन्यात मॅक्सवेलला वगळले जाण्याची शक्यता वाटत नाही.
दिल्लीने या मोसमात शानदार प्रदर्शन केले असून शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात चेन्नईवर विजय मिळविल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला. त्याला आता मोठी खेळी करण्याची गरज आहे. त्याचा साथीदार धवनने नाबाद शतकी खेळी करीत मागील सामना दिल्लीला जिंकून दिला होता. याशिवाय प्रत्येक सामन्यात त्याने थोडेफार योगदान दिले असल्याने 9 पैकी सात सामने त्यांना जिंकता आले आहेत. अक्षर पटेलने फक्त गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही आपली उपयुक्तता मागील सामन्यात दाखवून दिली आहे. त्याने जडेजाने टाकलेल्या शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकून दिल्लीला चेन्नईवर विजय मिळवून दिला होता. दिल्लीची गोलंदाजी लाईनअप इतकी भक्कम आहे की, अगदी कमी धावसंख्या असली तरी त्याचे यशस्वीरीत्या ते संरक्षण करू शकतात. जखमी पंतच्या जागेवर अजिंक्य रहाणेला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र या संधीचा त्याला लाभ उठविता आलेला नाही. या दोन संघांत झालेला मागील सामना सुपरओव्हरपर्यंत लांबला होता. त्याची पुनरावृत्ती मंगळवारी होणार नाही, अशी आशा पंजाबने बाळगली आहे.
संघ : दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल्। डेनिस सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत ब्रार, इशान पोरेल, मनदीप सिंग, नीशम, तजिंदर सिंग, जॉर्डन, करुण नायर, दीपक हुडा, बिश्नोई, अर्शदीप सिंग, मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सर्फराज खान, कॉट्रेल, अगरवाल, शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरन, गेल, एम.अश्विन, जगदीशा सुचित, के. गौतम, व्हिलोएन.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स









