प्रतिनिधी / विटा
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता आपण व्यावसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न काढले पाहिजे. शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल प्रकल्प हा शेतकऱ्यांना दिपस्तंभ ठरणार आहे. शिवप्रताप उद्योगसमूहाने शेतकऱ्यांना योग्य वेळी व्यासपीठ मिळवून दिले आहे, असे गौरवोद्गार कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काढले.
येथिल “शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल”चे उद्घाटन कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आले. येथिल शिवप्रताप मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास आमदार अनिलराव बाबर, आमदार मोहनराव कदम, कृषी संचालक दिलीप झेंडे, ऍग्रोटकचे संस्थापक प्रतापदादा साळुंखे, चेअरमन विठ्ठल साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. कदम म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे सोडून आधुनिक शेतीकडे वळावे. शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल प्रकल्प हा शेतकऱ्यांना दिपस्तंभ ठरणार आहे. शिवप्रताप उद्योगसमूहाने खरोखरच योग्य वेळी हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व आधुनिक अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान, खते बी-बियाणे, औषधे उपलब्ध झाले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार अनिल बाबर म्हणाले, आपल्या भागात टेंभू योजनेमुळे बहुतांश क्षेत्र ओलिताखाली येत आहे. शेतकऱ्यांनी आता पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. शिवप्रताप ॲग्रोमॉल आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व आधुनिक मशनरी तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्यासह दर्जेदार कंपनीचे संच पुरवित आहे. प्रतापशेठ दादांनी शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचे दालन खुले करून दिले आहे.
शेतीसाठी ए टू झेड देण्याचा संकल्प – प्रतापदादा
यावेळी संस्थापक प्रतापदादा साळुंखे म्हणाले, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल एकाच छताखाली सर्व शेतीचे साहित्य विक्री करणारा देशातील पहिला मॉल आहे. या ठिकाणी सात हजार पेक्षा जास्त वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. विळी, खुरपी खोरे-कुदळी ते पेरणी, काढणे – मळणी पर्यंत सर्व मशिनरी, त्याचबरोबर ठिबक इलेक्ट्रिक मोटर, पाईप लाईन, खते बी-बियाणे, औषधे, शेडनेट मल्चिंग पेपर सह इतर पॅकिंग साहित्य आहे. त्याचबरोबर जनावरांचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. थोडक्यात शेतीसाठी ए टू झेड गोष्टींचे उत्तर या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
महत्वकांक्षी प्रकल्प – विठ्ठल साळुंखे
यावेळी विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा शिवप्रताप शेतकरी उत्पादक कंपनीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. जे साहित्य आधुनिक शेतीसाठी उपलब्ध आहे, ते आमच्या शेतकऱ्यांसाठी इथे उपलब्ध करून देणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. शिवप्रताप चा नावलौकिक शेतकऱ्यांची सेवा करून अधिक उंचावर नेऊ. केवळ वस्तू विक्री नव्हे तर विक्रीपश्चात सेवा बांधावर जाऊन दिली जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना असणारे अनुदान, योजना, विमा योजना, बँक कर्ज यासाठी स्वतंत्र शेतकरी माहिती केंद्र सुरू केले आहे. त्याचाही उत्तम लाभ शेतकऱ्यांना करून देऊ, असे साळुंखे म्हणाले.








