रत्नागिरी जिल्हयातील हापूस उत्पादक बागायतदारांना लाभ
प्रतिनिधी / रत्नागिरी
आत्मनिर्भय अभियान अंतर्गत किसान रेलअंतर्गत शेतकऱ्यांची फळे, भाजीपाला वाहतूक व साठवणुकीवर केंद्र सरकार मार्फत 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे जिल्हयातील हापूस उत्पादक बागायतदारांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर कोकणातील आंबा वाहतुकीसाठी रेल्वे हा नवा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
आत्मनिर्भय भारत अभियानांतर्गत फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर व साठवणुकी इत्यादीसाठी 50 टक्के अनुदान केंद्र सरकार उपलब्ध करुन देणार आहे. याचा फायदा केकणातील हापूस आंब्याच्या वाहतूकीला देखील होणार आहे. वाहतूकीचा निम्मा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. यामुळे फळांची किंवा भाजीपाल्यांच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. किसान रेल मार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने शेतकरी फायद्यासाठी विविध योजना कार्यान्वीत केल्या आहेत. शेतकऱ्यांसह कोणतीही व्यक्ती किसान रेल मार्पत फळाची व भाजीपालाची वाहतूक करू शकणार आहे. रेल्वे या फळे व भाजीपाल्यांवर केवळ 50 टक्के शुल्क आकारणार असून उर्वरित शुल्काचा भार केंद्र सरकार उचलणार आहे. फक्त अधिसुचित फळे व भाजीपाल्याची मालवाहतूक करता येणार आहे.
महाराष्ट्रातील देवळाली, बिहारमधील,आंध्रप्रदेश तसेच बंगळुरू ते दिल्ली या दरम्यान तीन किसान रेल्वे कार्यरत आहेत. तर चौथी किसान रेल्वे महाराष्ट्रातील नागपूर ते दिल्लीपर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या योजनेत 19 फळांची किसान रेलमार्फत वाहतूक करता येणे शक्य आहे. आंबे, केळी, पेरू, किवी, लिची, मोसंबी, संत्री, किवी, लिंबू, पपई, अननस, डाळिंब,सफरचंद, आवळा आदी फळे पात्र ठरणार आहेत. तर भाज्यांमध्ये भोपळा, वांगी, गाजर, फुलकोबी, मिरची, भेंडी, काकडी, वाटाणे, कांदा, बटाटा आणि टोमॅटो आदी भाज्याची वाहतूक करता येणार आहे.