वार्ताहार / वारणा कापशी
माणगाव तालुका शाहूवाडी येथील जवान उदयसिंह पांडुरंग पाटील यांचे आसाम मधील सिलचर याठिकाणी देश सेवा बजावत असताना मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माणगांव व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव यांचे मुळगाव माणगाव तालुका शाहूवाडी येथे शनिवार दिनांक 17 रोजी आणण्यात आले. आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उदयसिंह पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिवारे – माणगाव येथे झाले .माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कापशी येथे झाले . उदयसिंह पाटील हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे .त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे पंचकृषीत त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय सेनादलातील बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) मध्ये 1998 साली सेवेत रुजू झाले. बीएसएफ च्या फर्स्ट लाईन डिफेन्स मध्ये ते हवलदार पदावर कार्यरत होते. निधना वेळी त्यांचे वय ४३ वर्षे होते. बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स मध्ये एकूण बावीस वर्षे त्यांनी सेवा बजावली. बेंगलोर मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगलोर ,आसाम, गुजरात ,जम्मू-काश्मीर ,त्रिपुरा ,गुजरात ,राजस्थान या ठिकाणी देशसेवा बजावली. त्यांच्या परिवारामध्ये पत्नी, दोन मुलगे, भाऊ ,बहीण असा परिवार आहे.
आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आज त्यांच्या मूळगावी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली तुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून मिरवणूक काढून शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले .माणगाव येथे त्यांच्या अंत्यविधीसाठी हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने ,शाहूवाडी पोलीस स्टेशनचे पी.आय .भालचंद्र देशमुख , जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती हंबीराव पाटील व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.