वार्ताहर/ राजापूर
शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि कुणबी समाजाचे नेते पांडुरंग बापू उपळकर यांच्या नावाला विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिवसेनेतून हिरवा कंदिल दर्शवलेला आहे. यापूर्वी शिवसेना नेत्यांनी तब्बल तीन निवडणुकांमध्ये उपळकर यांना थांबण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी उपळकर यांनीही पक्षाचा आदेश मानत दुसऱयांना संधी दिली होती. त्यामुळे आता तरी त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा कोकणात बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजात आहे.
मागील जवळपास तीन ते चार विधानसभा निवडणुकांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून राजन साळवी यांच्यानंतर चर्चेत असलेले नाव म्हणजे पांडूरंग उपळकर यांचेच राहिलेले आहे. सन 1996 पासून कोकणात शिवसेनेतर्फे उपळकर यांनी अनेक जबाबदाऱया शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यशस्वी करून दाखविल्या म्हणूनच शिवसेना राजापूर तालुका प्रमुख (मुंबई), तालुका संपर्कप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, 1996 लोकसभा कोकण विभाग समन्वय समिती प्रमुख व शिवसेना पक्षातील महत्त्वाचे रत्नागिरी जिल्हासंपर्क प्रमुखपदापर्यंत आपल्या निष्ठेने पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणून उपळकर यांच्या नावाची ओळख आहे.
सध्याच्या ओबीसी आंदोलनात अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे अध्यक्षपद सांभाळताना सर्व समाजाला एकत्र घेउढन आंदोलनात सहभागी करून उपळकर कार्यरत आहेत. काही वर्षापूर्वी रत्नागिरीत सात आमदार कुणबी समाजातील होते. सन 1985 च्या शिवसेनेच्या महाड अधिवेशनानंतर बाळासाहेबांच्या आदेशाने मुंबईशिवाय कोकणातील तरूण युवकांनी शिवसेना वाढीसाठी लक्ष केंद्रित केले. त्यात कोकणात असणाऱया 65 ते 70 टक्के कुणबी समाजातील लोकांनी शिवसेना वाढीसाठी अतोनात मेहनत घेतली. त्यावेळी पक्षाची निष्ठा समाजावर मात करून गेली मात्र पूढे झालेल्या निवडणुकीत रत्नागिरीतील सर्व आमदार युतीचे आले. परंतू त्यात रत्नागिरी तालुका सोडून सर्व आमदार कुणबी समाजविरहित होते.
विधानसभा किंवा विधानपरिषदेत कुणबी समाजांनी निवडून दिलेल्या मराठा आमदारांनी ज्या पध्दतीने मराठा आरक्षणाबाबत आपली हजेरी व विचार मांडले. तेव्हा कुणबी समाज जागृत झाला असून समाजासाठी एकजूट होऊ लागली आहे. त्यातूनच विधानपरिषदेवर कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयातील पदवीधर त्याचप्रमाणे कायदे विषयक व इंडियन इन्शुरन्स इन्स्टिय़ुट ऑफ इंडियाची सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व शिवसेनेची जबाबदार पदे सांभाळून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असलेल्या कोकणातील सच्चा शिवसैनिक असलेल्या उपळकर यांना संधी मिळावी अशी मागणी कोकणातील कुणबी समाजातून होत आहे.









