शहर परिसरात उत्सवाची तयारी सुरू : साधेपणावर भर
प्रतिनिधी/ बेळगाव
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. शहर परिसरात उत्सवाची तयारी सुरू आहे. कोरोनाचे संकट असल्याने प्रत्येकजण उत्सव साधेपणाने परंतु श्रद्धेने साजरा करण्यावर भर देत आहेत. दरवषी शहर परिसरात नवरात्र उत्सव मंडळातर्फे देवीची मूर्ती बसवून 9 दिवस उत्सव साजरा केला जातो. पहाटेची दुर्गामाता दौड, सकाळच्या सत्रात मंदिरांमध्ये होणारे धार्मिक विधी, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च रेलचेल दरवषी असते.
मात्र यंदा साधेपणावर भर देण्याची गरज असून मुख्य म्हणजे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्थात सर्व मंदिर समिती प्रमुखांनी, मंडळांनी, महिला संस्थांनी त्याबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे. दौड निघणार आहे, परंतु त्याचे स्वरूप कोरोनामुळे बदलले आहे. धार्मिक विधी पुरोहित करतील, परंतु भाविकांच्या गर्दीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.
नवरात्रीच्या आधी घर झाडून, पुसून लख्ख केले जाते. महिलांना याचा ताण वाटत नाही. परंतु यंदा मात्र पावसाने हा ताण जाणवून दिला. डबे-भांडी असो, अंथरूण-पांघरूण असो, पावसाने महिलांची परीक्षाच पाहिली. नऊ दिवस त्यांचे हात आता अखंड राबत राहणार आहेत. याच उत्साहाला शारदोत्सव द्विगुणीत करत असे. परंतु यंदा त्याचेही स्वरूप पालटले.
मंडळांतर्फे देवीसाठी मंडप उभारणी होत आहे. परंतु त्यांचे स्वरूप झगमगाटापेक्षा साधेपणाकडे झुकले आहे. यंदा गरब्याचा नाद होणार नाही. त्यामुळे तरुणाई कमालीची नाराज झाली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य आता प्रत्येकालाच समजल्याने यंदाची नवरात्र साधेपणावरच भर देणारी ठरणार आहे.









