बेळगाव / प्रतिनिधी
आता रेशनकार्डधारकांना दोन किलो हरभरा वितरण करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा खात्याने घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांपासून होणार आहे. त्यामुळे अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. सध्या अंत्योदय कार्डधारकांना राज्य सरकार 35 किलो तांदूळ तर प्रधान मंत्री कल्याण योजनेंतर्गत प्रत्येकी 5 किलो तांदूळ मिळतो त्यात आता दोन किलो हरभऱयाचा समावेश असणार आहे.
बीपीएल कार्डधारकांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ तर केंद्र सरकारकडून प्रत्येकी 5 किलो तांदूळ तर 2 किलो गहू मिळत होता. आता 2 किलो हरभरा मिळणार आहे. कुटुंबातील एका सदस्यामागे दहा किलो तांदूळ दोन किलो गहू देण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारक असलेल्या ग्रामीण भागातील 5512 तर शहरी भागातील 1112 तर बीपीएल कार्डधारक असलेल्या ग्रामीण भागातील 36629 तर शहरी भागातील 71328 कार्डधारकांना आता हरभरा मिळणार आहे. अशी माहिती माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिली आहे. तर एपीएल कार्डधारकांना 15 रुपये किलो दराने 10 किलो तांदूळ देण्यात येतो.
लॉकडाऊननंतर रेशनकार्डवर कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दहा किलो तांदूळ देण्यात येत होते. त्यामध्ये पाच किलो राज्य सरकार व पाच किलो केंद्र सरकारकडून तांदूळ पुरवठा करण्यात येत आहे. आता सर्रास व्यवहार सुरळीत होत असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यात 14 लाख 12 हजार रेशनकार्ड आहेत. त्यापैकी नियमित 11 लाख 21 हजार रेशनकार्डधारक अन्नधान्य खरेदी करतात. यापैकी बीपीएल रेशनकार्डची संख्या 10 लाख 77 हजार आहे. अंत्योदय रेशनकार्डधारक 44 हजार 155 आहेत.









